विघटनशील प्लॅस्टिकच्या निर्मितीला दोन पेटंट; वाळूजच्या 'स्पेशालिटी पॉलिफिल्मस्'चे संशोधन

waluj petant news.jpg
waluj petant news.jpg

औरंगाबाद : अतिशय धोकादायक प्रकारच्या पीव्हीसी प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आरोग्यावर विपरित परिणाम न करणाऱ्या विशेष पॉलिइथिलीन फिल्म्सच्या निर्मितीसाठी वाळूजमधील स्पेशालिटी पॉलिफिल्मस्ला दोन भारतीय पेटंट मिळाले आहेत. पॉलिइथिलीन बेस मीट रॅप अँड फ्रेश प्रोड्यूस फिल्म आणि पॉलिइथिलीन बेस फूड सर्व्हिस, केटरिंग फिल्म अशा या दोन उत्पादनांना पेटंट मिळाली आहेत. या उत्पादनांसाठीचे संशोधन या उद्योगात दीर्घकाळपासून सुरू होते.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शंतनू देशपांडे यांनी सांगितले, की स्पेशालिटी पॉलिफिल्मस सुमारे ३० वर्षांपासून पॉलिफिल्मच्या क्षेत्रात कार्यरत आहे. स्थानिक बाजारपेठेसह युरोप आणि अमेरिकेतही त्यांचा विस्तार झाला आहे. जगभरात सुरू असलेल्या अविघटनकारी प्लॅस्टिकपासून दूर जाण्याच्या चळवळीत त्यांनी आरोग्याला हानीकारक नसलेल्या पॉलिइथिलीन फिल्मच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले होते. १०० टक्के विघटनक्षम आणि आरोग्याला अपायकारक नसलेली ही फिल्म विकसित करण्यात ‘स्पेशालिटी’ला यश आले.  

स्पेशालिटीच्या या उत्पादनांना जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झालेल्या आयएफएफए २०१९ आणि नेदरलँडमधील ॲमस्टरडॅम येथे झालेल्या पीएलएमए २०१९ या दोन्ही प्रदर्शनांत अभिनव उत्पादने या श्रेणीत गौरवण्यात आले. ‘स्पेशालिटी पॉलिफिल्मस’ पॉलिइथिलीनवर आधारित उत्पादने जगभरातील अमेरिका, ब्रिटन, युरोपातील अनेक देश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह २५ हून अधिक देशांत ५० पेक्षा जास्त ग्राहकांना पुरविते. त्यांचे वार्षिक उत्पादन सुमारे १० हजार मेट्रिक टन एवढे असून जागतिक गुणवत्तेच्या पायाभूत सुविधा आणि बीआरसी -आयओपी आणि एसए ८००० मानांकन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. या पेटंट प्रकल्पात ‘जीएनपी लीगल कन्सल्टिंग’च्या प्रियांका अरोरा - मेहता यांनी ‘पेटंट अटर्नी’ म्हणून सहकार्य केले. ‘स्पेशालिटी पॉलिफिल्मस्’विषयी www.specialty-films.com या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

संशोधनाची उपयुक्तता 
‘फूड ग्रेड पॉलिमर’ आणि विशेष प्रकारच्या प्रक्रिया यांच्या संयुक्त मिलाफातून या कंपनीने ही नवी उत्पादने संशोधित केली आहेत. या नव्या दोन्ही फिल्मना या बाजारपेठेत असलेल्या पीव्हीसी फिल्मप्रमाणे कसलाही दुर्गंध किंवा कसलीही वाईट चव नाही. त्यामुळे मांस तसेच ताजी भाजी व फळेउत्पादने दुर्गंधीशिवाय दीर्घकाळ टिकविण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. विशेषतः पाश्चिमात्य देशांतील बाजारपेठेत ‘पॉलिइथिलीन बेस मीट रॅप अँड फ्रेश प्रोड्यूस फिल्म’ हे उत्पादन प्रभावी ठरणार आहे. अत्यंत पारदर्शकता, उणे ३० अंशांपर्यंत गोठवल्यानंतरही कायम राहणारी अखंडता, मायक्रोवेव्हमधील उच्च तापमानातही वापरण्यास योग्य अशी ही फिल्म सर्व प्रकारच्या भाजी व फळे तसेच मांसाच्या साठवणुकीस योग्य आहे. शिवाय हे उत्पादन हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग या तीनही व्यवसायांत उपयुक्त ठरणार आहे, असा विश्‍वास श्री. देशपांडे यांनी व्यक्त केला. 

(Edit-Pratap Awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com