रेल्वे प्लॅटफॉर्मवर अभ्यास करून पूर्ण केले आयएएसचे स्वप्न!

m sivaguru
m sivaguru

औरंगाबाद- तुम्ही इंग्रजी शाळेत शिकलात की मातृभाषेत, तुम्ही गरीब आहात, की श्रीमंत याचा काहीही फरक पडत नाही. यूपीएससी तुमच्याकडून फक्त विनातक्रार कठोर मेहनतीची अपेक्षा करते, असा सल्ला दिलाय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून देशात १०१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झालेले एम. सिवागुरू प्रभाकरन यांनी. एम. सिवागुरू तमिळनाडू राज्यातील पट्टुकोट्टईमधील मेलाओत्तान्काडू (जि. तंजावर) या छोट्याशा गावातून आलेले आहेत. त्यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्याच शब्दांत. 

वडील मद्यपी, आई-बहीण विकायच्या शहाळ्याची पाने 
वडील मद्यपी, आई व बहिणीने शहाळ्याची पाने विकून कुटुंबाची गुजराण केली. २००४ मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवूनदेखील आर्थिक परिस्थितीच नसल्याने अभियंता होण्याचे स्वप्न सोडावे लागले. कुटुंबाची जबाबदारी सिवागुरू यांच्यावर येऊन पडली. अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून चार वर्षे सॉ-मिलमध्ये (लाकडाची कंपनी) व शेतात मजुरीचे काम केले. थोडेफार पैसे जमवून मोठ्या बहिणीच्या लग्नाला हातभार लावला व लहान भावालादेखील अभियंता बनविले. चार वर्षे शिक्षणाचा संपर्क तुटूनही त्यांनी अभियंता होण्याचे स्वप्न मनात जिवंत ठेवले. जमवलेल्या थोड्या पैशाच्या आधारावर चार वर्षांनंतर २००८ मध्ये अभियांत्रिकीचे महाविद्यालय गाठून प्रवेश मिळवला. तेव्हा आई बचत करून प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये पाठवायची. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर २०१२ मध्ये आयआयटीचे स्वप्न घेऊन चेन्नई गाठले. राहण्यासाठी पैसे नसल्याने सेंट थॉमस माउंट रेल्वे स्टेशनचा आधार घेतला. रात्र, रेल्वेस्टेशनवर काढायची आणि दिवसा अभ्यास असा दिनक्रम सुरू झाला. २०१२ मध्ये ‘गेट’ परीक्षेच्या माध्यमातून देशात ३० वा रँक आला. पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी आयआयटी मद्रास येथे नंबर लागला. २०१४ मध्ये जिओ टेक्निकल विषयात एम.टेक. पूर्ण केले. भारतीय प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी २०१४ मध्ये भारतीय रेल्वे सेवेतदेखील त्यांची निवड झाली होती. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तेव्हाच ठरवलं आयएएस अधिकारी व्हायचं 
२००४ मध्ये कुंभकोणम येथे शाळा आग दुर्घटनेत ९४ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. तत्कालीन जिल्हाधिकारी जे. राधाकृष्णन यांना परिस्थिती हाताळताना जवळून पाहिले. त्यांची काम करण्याची पद्धत आणि जिल्हाधिकारी यांचे अधिकार याविषयी समजले. तेव्हाच मी आयएएस अधिकारी व्हायचं अस ठरवलं. त्यांच्याच पावलावर पाऊल २०१७ मध्ये दीर्घकाळचे स्वप्न सत्यात उतरले, असे एम. सिवागुरू सांगतात. मी चार वर्षांनंतर जेव्हा अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला तेव्हा माझा लहान भाऊ माझा सीनिअर होता. मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना मिळेल ते काम करायचो. मोबाईल रिचार्जसह छोटे-मोठे काम केले. माझी आई नारळाच्या पानापासून छत बनवण्यासाठी लागणार्‍या वस्तू बनवून विकायची. त्यातूनच मला महिन्याला पाचशे रुपये पाठवायची. आई तिसरी शिकलेली असूनही माझे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ‘जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मला एका पुस्तकाची आवश्यकता होती आणि विकत घेण्याची परिस्थिती नव्हती. पहाटे चारच्या सुमारास मी पुस्तकाशिवाय गृहपाठ कसा करावा, या काळजीत रडत होतो. माझ्या आईने मला रडताना पाहिले आणि तिने ताबडतोब कंदील घेऊन माझ्याबरोबर प्रस्थान केले. आम्ही एक किलोमीटर चालत गेलो आणि मला ते पुस्तक घेऊन दिले.’ 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

प्लॅटफॉर्मवर झोप अन् अभ्यासही 
नंतरच्या काळात माझ्या एका मित्राच्या ओळखीने आयआयटी शिकवणी वर्ग मोफत मिळाले; पण राहायचा प्रश्न होता. मी सेंट थॉमस रेलवेस्टेशन येथील दिव्याखाली रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचो आणि तसाच झोपी जायचो. पुढे २०१४ मध्ये मला भारतीय रेल्वे प्रशासन सेवेत नोकरी लागली; पण आयएएस व्हायचे स्वप्न स्वस्थ झोपू देत नव्हते. २०१७ मध्ये यूपीएससी उत्तीर्ण झालो. दहा ते बारा तास अभ्यास करायचो. अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यावर नोकरी लागली असती; पण मला आयआयटीत उच्चशिक्षण घ्यायचे होते. एका मित्राच्या ओळखीने चेन्नई येथील सेंट थॉमस माउंट येथे एका शिक्षकाची मोफत शिकवणीची सुविधा मिळाली. परंतु, तेथे एक समस्या होती, चेन्नई वेल्लूरपासून १४० कि.मी. अंतरावर आहे. मला येणे-जाणे परवडायचे नाही. शनिवारी वर्ग केला की मी रात्री सेंट थॉमस माउंट रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपायचो. रविवारी वेल्लूरला नियमित वर्गात जायचो आणि त्याच ठिकाणी फ्रेश व्हायचो. माझ्यासाठी हाच एकमेव परवडणारा उपाय होता. मी रेल्वेस्थानकाच्या दिव्याखाली रात्री उशिरापर्यंत वाचत बसायचो. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

मुलाखतीला जायलाही पैसे नव्हते... 
एम. सिवागुरू सांगतात, जेव्हा मला लोकसेवा आयोगाकडून मुलाखतीचे पत्र मिळालं तेव्हा माझ्याकडे दिल्लीला जाण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा मला माझ्या बँक खात्यात दहा हजार रुपये असल्याचे आठवले. मी ते काढण्यासाठी बँकेत गेलो होतो. तेव्हा शैक्षणिक कर्जाची घेतलेली रकमेची परतफेड न केल्यामुळे बँक अधिकार्‍यांनी मला ती रक्कम काढू दिली नाही. माझ्यासमोर मोठा प्रश्न होता; पण माझ्या आयआयटीच्या मित्रांना मला कॉल लेटर आल्याच समजले तेव्हा त्या सर्व मित्रांनी मला मदत केली. त्या पैशाच्या आधारावरच मी मुलाखतीपर्यंत जाऊ शकलो. प्रत्येक मुलाखतीनंतर मी लगेचच पुढच्या पूर्वपरीक्षेची तयारी सुरू करायचो. मी अयशस्वी होण्यापासून मौल्यवान धडे शिकलो आणि त्यांचा उपयोग भविष्यातील यशाची संधी म्हणून केला. 

एम. सिवागुरू मंत्र 
माझ्या प्रवासात असंख्य काटे होते. समस्यांचे डोंगर उभे होते; पण मी माझे 
स्वप्न साकार करण्यासाठी धडपड करायला आणि प्रयत्न करण्यास तयार होतो. 
रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपतानाही मला लोकांच्या तक्रारींचे निवारण करणारे कलेक्टर असल्याचे स्वप्न पडत असे. 
प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आपल्यासमोरच असतात, फक्त शोधक दृष्टी हवी असते. 
मला लोकलमध्ये धक्का खाणाऱ्या महिला दिसत होत्या. भीक मागणारे चिमुकले फिरताना रोजच दिसत होते. 
ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी मला आयएएस होणे गरजेचे असल्याचं मला वारंवार वाटायचं. आणि मी खडबडून जागा होऊन अभ्यासाला भिडायचो. 

तरुण-तरुणींना सल्ला 
तुमची इच्छाशक्ती तीव्र असेल, तुमचे ध्येय निश्चित असेल, जर तुमची कठोर मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही ही परीक्षा नकीच उत्तीर्ण होऊ शकता. कुठल्याही गोष्टीचा बाऊ करू नका. आणि मेहनत करायला कशाचीही कमतरता ठेवू नका. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी विनातक्रार करा. वाचून वाचून पाठ दुखत आहे. पाठीचा मणका दुखत आहे, अशा तक्रारी करू नका. खूप मेहनत करा, मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. यश निश्चित 
मिळेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com