परदेशी पाहुण्यांना बारावी पास गाईड कसा मार्गदर्शन करणार? 

प्रकाश बनकर
Saturday, 26 September 2020

  • दहावी-बारावी फॅसिलिटेटर घेणार पदवीधर गाईडची जागा. 
  • केंद्राच्या नव्या धोरणावर प्रश्नचिन्ह. 
  • विदेशी पर्यटकांना योग्य माहिती मिळेल का? 

औरंगाबाद : जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी भारतीय पर्यटन विभागातर्फे प्रशिक्षित केलेले पदवीधर रिजनल गाईड वर्षानुवर्षे काम पाहत आहे. अस्खलित इंग्रजीतून देशाच्या विविध पर्यटनस्थळाची माहिती हे गाईड देत आहेत. आता मात्र केंद्र सरकारने दहावी-बारावी फॅसिलिटेटर नेमण्याचे नवे धोरण आणले आहे. त्यामुळे मोडक्या तोडक्या इंग्रजीत विदेशी पर्यटकांना माहिती देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

स्टेट गाईड, रिजनल गाईड आणि लोकल गाईडच्या माध्यमातून पर्यटनस्थळाची माहिती देणाऱ्या गाईडसाठी आतापर्यंत पदवीचे शिक्षण आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व ही प्रमुख पात्रता होती. आता केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार दहावी-बारावी पास फॅसिलिटेटर नेमण्यात येत आहेत. त्यामुळे विदेशी पर्यटकास हवी असलेली माहिती, पर्यटनस्थळाचा इतिहास, संस्कृती आणि परिसराची माहिती दहावी किंवा बारावी पास व्यक्ती किती प्रमाणात समजवू शकेल, असा प्रश्न आहे. उलट यातून चुकीची, अपूर्ण किंवा जुजबी माहिती विदेशी पर्यटकांमार्फत विदेशात जाऊन देशाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने जाईल अशी भीती टुरिस्ट गाईड फेडरेशन ऑफ इंडियातर्फे व्यक्त केली जात आहे. 

केंद्राचे दुर्लक्ष 
देशभरात पर्यटनाचे हे नवे धोरण जाहीर करताना प्रादेशिक पर्यटक गाईड ही संकल्पना कायम ठेवण्यासाठी टुरिस्ट गाईड फेडरेशन ऑफ इंडियाच्या साडे तीन हजार गाईडने पर्यटन मंत्रालयासमोर माडल्या होत्या तरीही केंद्र सरकारने भूमिका स्पष्टपणे जाहीर केली नसल्याचा आरोप औरंगाबाद टुरिस्ट गाईड फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव उमेश जाधव यांनी केला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशी होते निवड 
पर्यटन विभागाने १९५८ रिजनल लेव्हल गाईडचा ठराव घेतला होता. देशातील पूर्व, पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर भारतातील पर्यटनस्थळाचे सर्वेक्षण करून किती पर्यटक येतात आणि त्यासाठी किती गाईड आहेत. याचे गणित मांडून गाईड नियुक्तीसाठी नोटिफिकेशन काढले जाते. त्यानंतर पूर्वपरीक्षा, लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखत घेतल्यानंतर त्यास सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊनच गाईडची नेमणूक होते. या प्रशिक्षणात देशातील पर्यटनस्थळांच्या माहितीबरोबर राजकारण, समाजकारण, रीतिरिवाज, धर्म, खेळ याचाही अभ्यासात आंतर्भाव असतो. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नवीन धोरण 
नवीन धोरणानुसार दहावी-बारावी उमेदवारांना फॅसिलिटेटर म्हणून ऑनलाइन कोर्स झाल्यानंतर गाईडचा दर्जा दिला जाणार आहे. २ मार्चपासून यांची पहिली बॅचही बाहेर पडणार असल्याचे उमेश जाधव यांनी सांगितले. यातून रोजगार निर्मिती होईल असे सरकारचे म्हणणे असले तरीही गुणवत्तेचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. फेडरेशनच्या माध्यमातून अध्यक्ष डॉ. अजय सिंग, तेजिंदर गुलाटी हे पर्यटन मंत्रालयाकडे पाठपुरावा करत आहेत. नवीन धोरणाला विरोध नाही; मात्र पूर्वीचा गाईडचा दर्जा कायम ठेवा अशी मागणी आहे. 
संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelfth Pass foreign visitors Guide guide Aurangabad news