वापरलेले हातमोजे पून्हा विक्रीस, १९ टन साठा जप्त, मुंबई पोलिसांची औरंगाबादेत कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

कोरोनाकाळात डॉक्टरांनी वापरलेले हातमोजे गोळा करून विक्रीच्या उद्देशासाठी त्यांचा साठा केल्याचा प्रकार येथे वाळूज एमआयडीसी आणि मुंबई पोलिसांच्या तपासात शनिवारी (ता. २२) उघडकीस आला.

वाळूज (जि.औरंगाबाद): कोरोनाकाळात डॉक्टरांनी वापरलेले हातमोजे गोळा करून विक्रीच्या उद्देशासाठी त्यांचा साठा केल्याचा प्रकार येथे वाळूज एमआयडीसी आणि मुंबई पोलिसांच्या तपासात शनिवारी (ता. २२) उघडकीस आला.

हेही वाचा-मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध

याप्रकरणी पोलिसांनी एमआयडीसीतील साजापूरमधील एका गोदामावर छापा टाकला. यात तब्बल १९ टन हातमोजे जप्त करून गोदाम सील करण्यात आले. कोविड-१९ च्या रुग्णांचे उपचार करताना डॉक्टरांनी वापरलेले निळ्या रंगाचे हातमोजे सुरक्षितपणे नष्ट करणे आवश्यक आहे. पण, ते जमा करून त्यांचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने ते साठवून ठेवण्याचा प्रकार मुंबई येथे नुकताच उघडकीस आला.

तपासात याचे धागेदोरे औरंगाबादमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे मुंबई पोलिसांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपी शेख अफरोज शेख इनायत याला ताब्यात घेतले. त्याने वाळूज औद्योगिक वसाहतीतील साजापूर शिवारातील गट क्रमांक १३, प्लॉट क्रमांक १८५ येथील गोदामामध्ये ठेवलेले सर्जिकल हातमोजे दाखवले.

क्लिक कराः तुळजापूरला जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग लागला कोसळू, वाहतूक झाली बंद

१९ टन वजन असलेल्या या सर्जिकल हातमोजांचा साठा पोलिसांनी शनिवारी जप्त केला असून, गोदाम सील करण्यात आले आहे. ही कारवाई वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक विजय खेरडे, गौतम वावळे व गुन्हे शाखेच्या पथकासह मुंबई पोलिसांनी केली. 

दोन दुचाकीचोर जाळ्यात 
औरंगाबाद, ता. २२ ः दुचाकी विक्रीसाठी टाऊन हॉल परिसरात आलेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले. शेख राजेक शेख सुलतान (२०, रा. हुसेन कॉलनी) आणि राजेंद्र विष्णू आधुडे (३२, रा. नवनाथनगर, भारतनगर) अशी त्या संशयितांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. 

क्लिक कराः पडक्या घरांचा आसरा; पुनर्वसन रखडले, गणेशोत्सव साजरा कसा करणार?

(संपादनः सुषेन जाधव)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Used Gloves Resell One Arrested Aurangabad News