
अस्तित्वात नसलेल्या आधार क्रमांकाची नोंदणी; आता अद्यावतीकरणाची मोहिम.
लातूर : राज्यातील ६४ लाख ५९ हजार शालेय विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची अद्यापपर्यंत सरल प्रणालीमध्ये नोंदणीच झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या नोंदणीत काही विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी झाली आहे. तसेच अस्तित्वात नसलेल्या आधार क्रमांकाचीही नोंदणी झाल्याचे आता शासनाच्या लक्षात आले आहे. वेगवेगळ्या योजनेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांनाच मिळावा या उद्देशाने आता आधारकार्डचे अद्यावतीकरण करण्याची मोहिम शासनाने हाती घेतली आहे. मार्चअखेरपर्यंत ही सर्व नोंदणी करून चुकीची झालेली नोंदणी आता वगळण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
राज्यात शालेय शिक्षण विभागांतर्गत एक लाख दहा हजार ३१५ शाळा आहेत. यात दोन कोटी २५ लाख ६० हजार ५७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शालेय पोषण आहार योजना, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मोफत गणवेश योजना , मोफत पाठ्यपुस्तक योजना तसेच इतर अनुषंगिक योजनांचा पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ देताना पात्र विद्यार्थ्यांची माहिती शासनाच्या सरल संकेतस्थळावर उपलब्ध असणे महत्वाचे आहे. ही सध्या तरी ती माहिती अपूर्ण आहे. असे असतानाच विद्यार्थ्यांना लाभ दिला जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या योजनांच्या लाभाचे दुबार प्रदान रोखण्यासाठी आता शासनाने पावलले उचलली आहेत. या करीता सर्व विद्यार्थ्यांचे आदार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंद होणे आवश्यक आहे. राज्यात सध्या ६४ लाख ५९ हजार ३८८ विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची सरल प्रणालीत नोंदच नसल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर काही विद्यार्थ्यांचे दुबार नोंदणी करण्यात आले आहे. म्हणजेच एकच आधार पण दोन नावांचे वेगळे विद्यार्थी दाखवण्याचे प्रकार समोर आले आहेत. इतकेच नव्हे तर काही अस्तित्वात नसलेले आधार क्रमांक नोंदणी झाल्याचा गंभीर प्रकारही शासनाच्या लक्षात आला आहे. यातून आता आधार क्रमांक सरल प्रणालीशी नोंदणी करण्य़ाकरीता अद्यावतीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन आधार क्रमांक नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड असलेल्या पण चालू शैक्षणिक वर्षामध्ये वयाची पाच किंवा १५ वर्ष पूर्ण होणाऱया विद्यार्थ्यांच्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आधार नोंदणीमध्ये बायोमेट्रीक अपडेटद्वारे अद्यावत करण्यात येणार आहे. आधार कार्ड असलेल्या पण आधारकार्डवरील नाव, जन्म तारीख, लिंग व पत्ता या मध्ये बदल करावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांची डेमोग्राफीक अपडेटद्वारे दुरुस्तीही करण्यात येणार आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोहिम असणार आहे. कोरोनाच्या उपाय योजनांचे पालन करीत ता. ३१ मार्च २०२१ पर्यंत हे काम पूर्ण करावे, असे आदेशही शासनाने दिले आहेत.
८१६ आधार नोंदणी संच
राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि अद्यावतीकरणाचे काम करण्य़ासाठी एकूण ८१६ आधार नोंदणी संच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक पंचायत समितीस्तरावर दोन या प्रमाणे ८१६ आधार नोंदणी केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुरवठा केलेल्या संचापैकी प्रत्येक जिल्ह्यामधील दोन आधार नोंदणी केंद्र कार्यान्वीत केले जाणार आहेत.
(संपादन-प्रताप अवचार)