
लातूरच्या सायबर व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लातूर : रामेगाव तांडा (ता. लातूर) येथून चोरीस गेलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात येथील सायबर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
रामेगाव तांडा येथील बाळासाहेब राठोड यांचे साडेतीन लाख रुपये किमतीचे महिंद्रा अर्जुन आल्ट्रा एक कंपनीचे ट्रॅक्टर हेड (एमएच २४ एजी ०४७७) बुधवारी (ता. चार) रात्री चोरीस गेले होते.
या प्रकरणी गातेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यात पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पथके नियुक्त केली होती. त्या अनुषंगाने सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एन. डी. उबाळे, सहायक पोलिस निरीक्षक सूरज गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. बुधवारी या पथकाच्या पोलिसांनी वाहनाचा व आरोपीचा शोध घेत मुरुडकडे जात असताना एक व्यक्ती ट्रॅक्टरचे हेड घेऊन लातूर वरंवटी रायवाडी रस्त्याने जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. हे ट्रॅक्टरचे हेड चोरीचे असल्याचे खात्री झाल्यानंतर पोलिसांनी रायवाडी शिवारात आरोपीचा शोध घेतला.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
यात पोलिसांनी शिवदर्शन सदाशिव हिंगमिरे (वय २७, रा. हरंगूळ) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले हे ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने हे ट्रॅक्टर चोरीचे असल्याचे कबूल केले. तसेच या पूर्वी गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एचएच २४ एव्ही ८७१९ ही मोटारी सायकल चोरी केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी हे ट्रॅक्टर तसेच मोटार सायकल असा एकूण चार लाखांचा माल जप्त केला आहे. याकरिता सहायक पोलिस निरीक्षक सूरज गायकवाड, पोलिस नाईक प्रदीप स्वामी, अमर वाघमारे या सायबर पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड, हवालदार राम गवारे, पोलिस नाईक सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राजू मस्के यांनी पुढाकार घेतला.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)