संयोजकांमुळेच साहित्य संमेलनात गोंधळ

हरी तुगावकर
रविवार, 12 जानेवारी 2020

  • ॲड. जगन्नाथ पाटील यांचा आरोप
  • साहित्य संमेलनात संत पीठावर चर्चा न होणे दुर्दैवी

लातूर : उस्मानाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संत साहित्यावरील परिसंवादात संत पीठावर बोलू द्यावे, म्हणून आपण परिसंवादाच्या अध्यक्षांकडे परवानगी मागण्यासाठी गेलो होतो. पण आपण गोंधळ करायला आलो आहोत, असा गैरसमज संयोजक आणि सुरक्षारक्षक यांना झाला.त्यांच्यामुळेच संमेलनात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यात होणाऱया या संमेलनात पैठणच्या संत पीठावर चर्चा न होणे हे दुर्दैवी आहे, अशी माहिती ॲड. जगन्नाथ पाटील यांनी रविवारी (ता. १२) येथे पत्रकार परिषदेत दिली.

''राज्य शासनाने २५ वर्षापूर्वी पैठणला संतपीठाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. कोट्यवधीचा निधी देऊन तेथे इमारतही बांधली आहे. संतपीठाची नोंदणी मुंबई धर्मादाय कार्यालयात झाली आहे. त्यानंतर मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हे संत पीठ सुरु करावे म्हणून मी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. यात शासनाला न्यायालयाने नोटीसही काढली आहे. या मागणीला साहित्य संमेलनात होत असलेल्या संत साहित्यावरील परिसंवादात पाठिंबा मिळावा म्हणून तेथे गेलो होतो, असे जगन्नाथ पाटील यांनी सांगितले. 

याच मुद्द्यासंदर्भात दोन मिनिटे बोलण्यासाठी परिसंवादाच्या अध्यक्षांची परवानगी घेण्यासाठी व्यासपीठावर गेल्याचे ते म्हणाले. कसलाही वाद, गडबड अथवा गोंधळ नव्हता. पण संयोजक व सुरक्षारक्षकाना आपण गोंधळ घालण्यासाठी तेथे आलो आहोत असा गैरसमज झाल्याने त्यांनी आपल्याला व्यासपीठाखाली आणले. पहिल्यापासूनच हे संमेलन भितीखाली आहे, असे दिसून येत होते. परिसंवादात उडालेले गोंधळ माझ्यामुळे नाही तर संयोजक व सुरक्षारक्षकामुळे उडाला, असे ॲड. पाटील म्हणाले.

परिसंवादाला काय अर्थ

संत साहित्याच्या परिसंवादात संतपीठावर बोलू दिले जात नसेल, तर या परिसंवादाला काय अर्थ राहणार आहे. मराठवाड्यात होत असलेल्या या साहित्य संमेलनात पैठणच्या संतपीठावर साधी चर्चाही न होणे हे दुर्दैवी आहे. संत पीठासाठी बोलण्याची परवानगी मागण्यासाठी गेलो असताना तेथील कार्यवाह मला वेडसर म्हणत असतील, तर संतपीठाच्या निर्मितीसाठी वेडेही व्हावे, लागेल असेही ॲड. पाटील म्हणाले.

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad Latur News