बृहृन महाराष्ट्र मंडळाला नियमित अनुदान मिळावे : डॉ. विद्या देवधर

आशिष तागडे
Sunday, 12 January 2020

आम्ही स्वखर्चाने त्या संस्था चालवित असतो. परंतु आम्ही लोकांसाठी जे उपक्रम करतो, ते चालविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आम्हाला नियमितपणे दरवर्षी काही अनुदान दिले तर आर्थिक पाठबळ मिळेल.

संत गोरोबा काका साहित्य नगरी, उस्मानाबाद : मराठी भाषेसाठी परराज्यात काम करणाऱ्या बृहृनमहाराष्ट्र मंडळास महाराष्ट्र शासनाने नियमित्त स्तरावर अनुदान द्यावे, अशी मागणी मराठी साहित्य परिषदेच्या (तेलंगण राज्य) अध्यक्षा आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. विद्या देवधर यांनी 'सकाळ'शी बोलताना केली.

देवधर म्हणाल्या, की चाळीस वर्षाहून अधिक हैदराबादला चालणाऱ्या साहित्य परिषदेच्या कामाशी मी संबंधित आहे. हैदराबादला असलेल्या मराठी साहित्य परिषदेमार्फत प्रकाशित होत असलेल्या पंचधारा या त्रैमासिकाने मराठी जगतात वेगळा ठसा उमटविला आहे. आमच्या साहित्य परिषदेने साहित्याचे विशेषांक काढले आहेत. सेतू माधवराव पगडी समग्र साहित्याचे दोन खंड प्रकाशित केले आहे. आम्ही मराठी सायंकालीन महाविद्यालय चालवितो. भारतामध्ये साहित्य संस्था चालवित असलेले हे एकमेव सायंकालीन मराठी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात आम्ही विद्यार्थ्यांना विनामुल्य शिक्षण देत असतो. मराठीच्या दृष्टिने हे महाविद्यालय अतिशय महत्त्वाचे आहे. कारण मराठीचा उत्तम शिक्षक तेथे तयार होतो. आणि त्यातील सीमा भागातील, विकासापासून दूर असलेल्या मुलांना या ठिकाणी शिक्षण दिले जाते. 

साहित्य परिषदेला उत्पन्नाचे साधन नाही. परंतु मराठी भाषा टिकविण्यासाठी विविध उपक्रम, सेमिनार घेणे, शाळा-शाळांतून मराठीची गोडी वाढेल अशी अनेक उपक्रम आम्ही सातत्याने राबवितो. या संस्थेची स्थापना होऊन साठ वर्षे झाली. आम्ही महाराष्ट्राकडे आशेने पाहतो आहे.आमच्याकडे जे मराठीचे काम चालते, तसे बृहृन महाराष्ट्रात विविध ठिकाणी काम चालते. त्या सगळ्यांना महाराष्ट्र शासनाचे आर्थिक पाठबळ मिळावे. आम्ही स्वखर्चाने त्या संस्था चालवित असतो. परंतु आम्ही लोकांसाठी जे उपक्रम करतो, ते चालविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आम्हाला नियमितपणे दरवर्षी काही अनुदान दिले तर आर्थिक पाठबळ मिळेल. या आमच्या कामात सातत्य राहिल आणि पुढील पिढी काम करेल. निरपेक्ष पद्धतीने चालणाऱ्या कामाची दखल घ्या आणि त्याला सहाय्य होईल, अशी भूमिका घ्या, असे डॉ. देवधर यांनी म्हटले. 

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad Latur News