कवींवर अपेक्षांचे ओझे लादू नका ; वाचा कोण कोण म्हणतंय...

आशिष तागडे
शनिवार, 11 जानेवारी 2020

वाढलेले काव्यलेखन ही या काळाची डोकेदुखी नसून मध्ययुगीन काळापासून आहे. त्यावर संत तुकाराम महाराजांनी कडक शब्दात प्रहारही केला आहे. आजची परिस्थिती ही गंभीर आहे.

संत गोरोबा काका साहित्य नगरी, उस्मानाबाद : रसिकांच्या कवींकडून खूप अपेक्षा असतात. त्यानुसार कवी लिहीत असतो. अपेक्षांचे ओझे त्याच्यावर न लादता त्याच्या कवितांकडे निरंकुश पद्धतीने पहावे, असे आवाहन परिसंवादात सारस्वतांनी व्यक्त केले. 

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी "आजचे भरमसाट कविता लेखन : बाळसं की सूज?' या विषयावर संमेलनाचे माजी अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यामध्ये डॉ. कैलास अंभुरे, डॉ. समिता जाधव, डॉ. श्रीकांत पाटील, अरुण म्हात्रे, सीमा शेटे-रोडे आदी सहभागी झाले होते. 

साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

परिसंवादाच्या सुरवातीलाच डॉ. जाधव यांनी हे बाळसं नसून सूज असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, "वाढलेले काव्यलेखन ही या काळाची डोकेदुखी नसून मध्ययुगीन काळापासून आहे. त्यावर संत तुकाराम महाराजांनी कडक शब्दात प्रहारही केला आहे. आजची परिस्थिती ही गंभीर आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळे खूप जण कवी म्हणून मिरवायला लागले आहेत. त्यामुळे कसदार कविता कमी झाल्या आहेत. कवितांमध्ये अनुकरणतेचा ट्रेंड आला आहे. कवितेतील संवेदनशीलता, आकलन शक्ती कमी होत आहे. चांगल्या कविता लक्षात राहतात. सद्यस्थितीत एखादी कविता आवडली, की प्रत्येक कविसंमेलनात तीच वाचली जाते. त्यामुळे गंभीर कवितांचा आवाज दाबला जातो.'' 

प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी

सीमा शेटे-रोडे यांनी मात्र सूज अनारोग्याचे लक्षण असले, तरी आज कवितेने बाळसे धरलेले आहे, असे सांगितले. भावनांची स्पंदने कवितेत उमटतात. मनाला भिडते ती कविता, असे सांगत त्या म्हणाल्या, "नेमक्‍या शब्दांचे प्रकटीकरण म्हणजे कविता. सोशल मीडियामुळे भारंभार कविता तयार होत आहेत, मान्य आहे. त्याठिकाणी येणाऱ्या लाईकवर कवी असल्याचे ठरते. लिहिणाऱ्याने लिहीत जावे, वाचणाऱ्याने वाचत जावे. तरुण पिढी नव्या शब्दांसह व्यक्त होत आहे. परंपरेचे स्वत्व घेऊन कविता येत असल्याने ती आताच्या काळात बाळसेदारच आहे.'' 

Video : अशी निघाली साहित्याची उस्मानाबादेत ग्रंथदिंडी

श्रीकांत पाटील म्हणाले, "कविता ही आनंदाची प्रक्रिया आहे. अंगभूत सामर्थ्याच्या जोरावर कवी कविता निर्माण करतो व मराठी प्रवाह समृद्ध करतो. कविता लिहिणे म्हणजे शब्दांची साधना आहे. एक अनिवार्य ओढ आहे. त्यामुळे कवितांची संख्या वाढायला लागली हा प्रश्‍न विचारणे चुकीचे आहे. आजची कविता ही बाळसेदारच आहे. कवितेवर सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. कवितेला वगळून साहित्यविश्‍व पूर्ण होणार नाही. नवकवींना समीक्षक, अभ्यासकांनी आणि ज्येष्ठ कवींनी मार्गदर्शन केले पाहिजे.'' 

Video : साहित्य संमेलनातच आढळली पायरटेड पुस्तके  

डॉ. अंभुरे म्हणाले, "कविता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने काही त्रास होतो का? काळ बदलत आहे, त्यानुसार कविता आणि कवींची संख्या वाढत आहे. त्यामुळे काव्यभाषा, काव्यानुभव समृद्ध होत आहे. समाजमाध्यमांच्या विस्फोटामुळे कवितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्याला सेन्सॉरशिप लावण्याची आवश्‍यकता आहे. समाजातील विखंडीत जगणे कवी मांडत असतो. कवितेतील भाव कमी होत असला, तरी तो भाषेचा गर्भ सुरक्षित ठेवत आहे. कवींनी संयम बाळण्याची आवश्‍यकता आहे.'' 

तिसऱ्याने भाष्य करू नये

म्हात्रे म्हणाले, "कवितेकडे निरंकुशपणे पहावे. वारीमध्ये आपण ज्याप्रमाणे भक्तिभाव पाहतो, त्याप्रमाणे कवितेकडे त्या भावनेतून पहावे. कविता हा कवी आणि रसिकांचा संवाद असतो, त्यावर तिसऱ्याने भाष्य करू नये. कविता हे मूल आहे, हे समजून ती लक्षात घ्यावी. प्रांतानुसार कवी आणि कवितांची विभागणी धोकादायक आहे. कवितेचे योग्य मूल्यमापन केले पाहिजे. अन्यथा भविष्यात कविता नियंत्रण बोर्ड करावे लागेल. समीक्षकांनी कवितेचे योग्य पद्धतीने समीक्षक करावे.'' 

करमणूकप्रधान कविता ही सूजेसारखी ​

अध्यक्षीय मनोगतात श्री. काळे यांनी करमणूकप्रधान कविता ही सूजेसारखी असल्याचे लक्षात आणून दिले. ते म्हणाले, "कवितेत संख्यात्मक वाढ होत असली तरी गुणात्मक होत नाही. सर्वांनी अंतर्मुख होऊन या विषयाचा विचार करावा. कवितेत अनुभूती आणि आत्मानुभूती प्रथम असावी. प्रत्येक अनुभव ही कविता होऊ शकत नाही. विलक्षण सत्य गवसते, तेव्हाच कवितेचा आघात होत असतो. कवींनी शांततेचा आवाज ऐकावा. समाजाने कवींवर अपेक्षांचे ओझे देऊ नये, ही समाजाची जबाबदारी आहे.'' कवितेत तादात्म्य, धीर असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News