पेन हातात घेणे, युद्धाला उभे राहण्यासारखेच

सुशांत सांगवे
रविवार, 12 जानेवारी 2020

  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात युवा लेखकांची भावना
  • आजच्या कथा लेखकांशी रंगला संवाद

संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : पेन हातात घेणे, हे युद्धाला उभे राहण्यासारखेच आहे. तरी लेखक-कलावंत आपल्या माध्यमातून व्यक्त होत आले आहेत. पुढेही व्यक्त होत राहणार. ते व्यवस्थेला प्रश्न विचारत आले आहेत. प्रश्न विचारणे हे त्यांचे कामच आहे. गप्प बसून भागणार नाही, अशा भावना युवा लेखकांनी व्यक्त केल्या.

साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवसाची (ता. 12) सुरवात झाली ती 'संवाद: आजच्या कथा लेखकांशी' या परिसंवादाने. यात डॉ. आसाराम लोमटे, किरण येले, संजय कळमकर, बालाजी सुतार, किरण गुरव हे नव्या पिढीतील कथा लेखक सहभागी झाले होते. त्यांच्याशी राम जगताप, दत्ता घोलप यांनी संवाद साधला. यावेळी या कथाकरांनी अंगावर शहारे आणणाऱ्या कथांपासून खळखळून हसवणाऱ्या कथा सादर श्रोत्यांना वेगळा विचार करायलाही भाग पाडले.

डॉ. आसाराम लोमटे : कुठलाही काळ सर्जनशील लेखकांसाठी आव्हानात्मक असाच असतो. तो लोकांच्या जगण्यावर भाष्य करत असतो. जगणे मांडत असतो. लोकांची गोष्ट तो मांडत असतो. ही गोष्ट कधीही संपणार नाही. गोष्टीला मरण नसते. माणूस जिवंत आहे तोपर्यंत गोष्ट आहे. ती लेखकातून व्यक्त होत राहणार.

किरण येले : मी स्त्रियांशी संबंधित लेखन केल्यामुळे अनेकांना या लेखनावरून आणि नावावरून मी स्त्री आहे, असे वाटले. पण मला जे जाणवत राहिले ते मी कथांतून मांडत राहिलो. वाचकांना ते आवड गेले. भाषा ही कायम प्रवाही राहिलेली आहे. ती ठप्प राहिलेली नाही. त्यामुळे मला कायम वाटते की कथेची, कवितेची, नाटकाची भाषा ही लोकांची भाषा असली पाहिजे. तर ती भिडते.

संजय कळमकर : शिक्षण व्यवस्थेत सर्व छान चालले आहे, असे नाही. ते एकमेकांना फसवत आहेत. यावर मी कथांतून भाष्य केले आहे. आजचे शिक्षणातील वास्तव बदलण्याची गरज आहे, असे मला वाटते. त्यामुळे मी कायम व्यवस्थेतील त्रुटींचा वेध घेत आलो आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात. त्यातली विसंगती मी मांडत आलो आहे. कारण हसत-खेळत मांडले की पटते.

बालाजी सुतार: एकूणच गेल्या 25 वर्षात तुकडे-तुकडे करण्याची पद्धत वाढली आहे. एकच माणूस अनेक तुकड्यात जगत आहे. याकडे मी कथेतून लक्ष वेधून घेत आलो आहे. हा काळ वेगाने बदलत आहे. मूल्यांची फेरमंडणी करण्याचा हा काळ आहे. काळाशी सांगड घालून लेखक लिहीत आहेत. सोशल मिडियाचा वापर वाढला असला तरी ती काळाची गरज आहे. बोलीभाषांना यामुळे एक स्थान मिळाले आहे.

किरण गुरव: लहान वयात अनेक मान्यवर लेखकांच्या चांगल्या कथा वाचायला मिळाल्या. त्यामुळे आपण लिहावे असे वाटू लागले. गावकी ही माझी पहिली कथा. 'सकाळ साप्ताहिक'च्या झालेल्या स्पर्धेत मला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळाले. मी पुढे लिहीत राहिलो. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. या माध्यमाचा वापर करत वाचकांशी संवाद साधत आहे.

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News