एटीएमची अदलाबदल करून ग्राहकांना लुटणाऱ्या फौजीला उल्हासनगरमधून अटक

विकास गाढवे
Thursday, 19 November 2020

एटीएममधून पैसे काढता न येणाऱ्यांचा फायदा उठवून हातचालखीने एटीएम कार्डाची अदलाबदल करायची आणि त्यातून पैसे काढून लोकांची फसवणूक करायची. जिल्ह्यात घडलेल्या अशा दोन घटनांचा तपास लावण्यात सायबर व गांधी चौक पोलिसांना यश आले असून पोलिसांनी उल्हानगर (जि. ठाणे) येथून एकाला अटक केली आहे.

लातूर : एटीएममधून पैसे काढता न येणाऱ्यांचा फायदा उठवून हातचालखीने एटीएम कार्डाची अदलाबदल करायची आणि त्यातून पैसे काढून लोकांची फसवणूक करायची. जिल्ह्यात घडलेल्या अशा दोन घटनांचा तपास लावण्यात सायबर व गांधी चौक पोलिसांना यश आले असून पोलिसांनी उल्हानगर (जि. ठाणे) येथून एकाला अटक केली आहे. गणेश भालचंद्र लोडते उर्फ फौजी (वय 25) असे या आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्यात वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पैसे काढण्यासाठी बँकेत रांगेत थांबण्याऐवजी अनेक ग्राहक एटीएमच्या साह्याने पैसे काढण्याला प्राधान्य देतात. यामुळे बहुतांश ग्राहकांकडे एटीएम कार्ड असले तरी त्याचा वापर अनेकांना करता येत नाही. यातूनच एटीएम मशीनसोबत अनेकांची झटापट सुरू असते. यात काही ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एटीएमच्या बाहेर तासन् तास उभारत अशा ग्राहकांना हेरून त्यांना लुटण्याच्या घटना जिल्ह्यात अहमदपूर व गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. यातील आरोपीने एटीएममधून पैसे काढता येत नसलेल्या लोकांना मदत करण्याचा बहाणा करून हातचालखीने एटीएम कार्डची अदलाबदल केली व एटीएममधून रक्कम काढत दोघांची फसवणुक केली. पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी या घटनांची गंभीर दखल घेऊन तपास करण्याचे आदेश दिले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर या प्रकरणी दाखल दोन गुन्ह्यांचा तपास गांधी चौक व सायबर ठाण्याच्या पोलिसांनी सुरू केला. यात पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणी भेटी देऊन आरोपीच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला. त्यानंतर असे गुन्हे करणाऱ्या राज्यातील आरोपींची माहिती घेऊन त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले. यात गणेश लोडते (रा. संत ज्ञानेश्वरनगर, खेमाणी, उल्हानगर - 2, जि. ठाणे) हा बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती लातूर जिल्ह्यात येऊन गेल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून लोकांचा बँक खात्यातून रोख रक्कम काढून फसवणुक केल्याचे कबुल केले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यभरातील विविध शहरात असेच उद्योग करायचा

असे गुन्हे करणारी टोळीच असून गणेश लोडते हा राज्यातील अकोला, यवतमाळ, वर्धा, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, सोलापूर व पुणे येथे त्याच्या साथीदारांसोबत फिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सहायक पोलिस निरीक्षक सुरज गायकवाड, पोलिस नाईक संतोष देवडे, रियाज सौदागर, राजेश कंचे, गणेश साठे, गांधी चौकचे पोलिस निरीक्षक प्रशांत लोंढे, पोलिस नाईक शाम दुड्डे, नारायण वाघमारे व पोलिसांनी पुढाकार घेतला.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested for robbing customers switching ATM latur news