आष्टीत पकडलेल्या 180 क्विंटल तांदळाचा मालक अद्याप गुलदस्त्यात, प्रकरणावर पडदा

अनिरुद्ध धर्माधिकारी
Friday, 23 October 2020

  • रेशनच्या तांदळाची चर्चा, संशयाचे धुके कायम.
  • पंचनाम्यावरुन आठवडाभर एकमेकांकडे बोट. 
  • तहसीलदारांची बदली पथ्यावर. 

आष्टी (बीड) : आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतलेला तांदळाचा ट्रक व त्यातील मालाच्या पंचनाम्यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. महसूल व पोलिसांनी एकमेकांकडे बोट दाखविल्याने हा ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारात आठवडाभर उभा होता. अखेर पुरवठा विभागाच्या पंचनाम्यानंतर तो माल रेशनचा नसल्याचा निर्वाळा देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला असला तरी, या ट्रकचा व धान्याचा मालक कोण? माल कोठे चालला होता, हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

त्यामुळे महसूलच्या पंचनाम्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 
आष्टी पोलिसांनी पेट्रोलिंग करीत असताना (ता.2) ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास एक संशयास्पद ट्रक (एमएच 23-एव्ही 0495) कडा-धामणगाव रस्त्यावर पकडला. त्यात 50 किलो वजनाच्या 360 गोण्यांमध्ये 180 क्विंटल तांदूळ होता. पोलिसांनी विचारपूस केली असता चालकाकडे धान्याची कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे हा रेशनचा तांदूळ असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ट्रक आष्टी पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावला. दरम्यान, ट्रकमधील तांदळाचा पंचनामा करण्यावरून पोलिस व महसूलने एकमेकांकडे बोट दाखविल्याने ट्रक सुमारे आठवडाभर पोलिस ठाण्यातच उभा होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या कालावधीत ट्रक सोडविण्यासाठी धान्य माफियांचे तहसील व पोलिस ठाण्यातील हेलपाटे आष्टीकरांच्या नजरेत भरले होते. अखेर आष्टी तहसीलमधील पुरवठा अधिकारी यांनी ट्रकमधील तांदूळ रेशनचा नसल्याचा पंचनामा अहवाल दिला. त्यामुळे ट्रक सोडण्यात आला आहे. परंतु हा माल रेशनचा नव्हता तर ट्रकचा मालक कोण? माल कोठून आला होता, कुठे चालला होता यासह अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने या प्रकरणाबाबतचे संशयाचे धुके पंचनाम्यानंतरही कायम आहे. या प्रकरणात आष्टी शहरातील एका धान्य प्रक्रिया केंद्राचे नाव सुरुवातीपासून पुढे येत असल्याने काहीतरी काळेबेरे असल्याची चर्चा उघडपणे होत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पांढर्या गोण्या कंपनीच्या, काळ्या गोण्या कोणाच्या?
 
ट्रकमध्ये काळ्या व पांढर्या गोण्यांमध्ये तांदूळ होता. त्यापैकी पांढर्याच गोण्यांवर खासगी कंपनीचे नाव असून काळ्या गोण्यांवर छपाई नाही. त्यामुळे हा तांदूळ भारतीय खाद्य निगम अथवा कोणत्याही शासकीय योजनेचा नसल्याचे आष्टी पुरवठा विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. परंतु पांढर्या गोण्यांवर खासगी कंपनीचे नाव असले तरी काळ्या गोण्यांवर छपाई नसल्याने या गोण्या कोणाच्या याबाबतचा संशय कायम आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तहसीलदारांची बदली पथ्यावर 

तांदळाचा हा ट्रक पकडल्यानंतर त्याच कालावधीत आष्टीच्या तहसीलदारांची बदली झाली. त्यामुळे नूतन तहसीलदार या प्रकरणाची माहिती आपल्याकडे नसल्याचे सांगतात. बदली प्रक्रियेच्या कालावधीतच ट्रकच्या मालाचा पंचनामा पूर्ण होऊन एकप्रकारे ट्रकमालक व सर्व संबंधितांना ‘क्लीन चिट’ मिळाली असून, तहसीलदारांची बदली एकप्रकारे संबंधितांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashti police and supply department pressed case 180 quintals rice Owner not found