आदिशक्तीचा आजपासून जागर 

आदिशक्ती २.jpg
आदिशक्ती २.jpg

औरंगाबाद : नवरात्रोत्सवास शनिवारपासून (ता.१७) प्रारंभ होणार आहे. घराघरात मोठ्या भक्तिभावाने घटस्थापना होणार आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. यासाठी शुक्रवारी (ता.१६) घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. 


कोरोनामुळे मानाची असलेली कर्णपुरा यात्राही रद्द करण्यात आली आहे. केवळ पुजाऱ्यांच्या हस्ते सकाळी सव्वासात वाजता विधिवत घटस्थापना केली जाणार आहे. अशाच प्रकारे रेणुकामाता मंदिरातही देवीची पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा करीत घटस्थापना होईल. शहरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद असतील. मात्र, नियमित सकाळ व सायंकाळी आरती केली जाणार आहे. 

खरेदीसाठी बाजारात गर्दी 
गुलमंडी, टीव्ही सेंटर, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, आविष्कार चौकात मातीचे घट, सप्तकडधान्य, नागवेलची पाने, हारतुरे, फुले, अगरबत्ती, गुगुळ, काळी माती, गोवऱ्या यांची खरेदी महिलांनी केली. आज अमावस्या असल्याने अनेकजण घटस्थापनेच्या दिवशी खरेदी करणार आहेत. कोरोनामुळे घटस्थापनेच्या साहित्यात कुठलीच वाढ झालेली नाही, असे विक्रेते बबन मिसाळ व सुनीता काळे यांना सांगितले. 

मूर्ती खरेदीला अल्पप्रतिसाद 
यंदा सरकारने चार फुटांपर्यंत देवीची मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार मूर्तिकारांनी एक ते चार फुटांपर्यंत देवीचे विविध रूप असलेली मूर्ती तयार करून विक्रीसाठी आणल्या होत्या. मात्र, शुक्रवारी अल्पप्रतिसाद मिळाला. दरवर्षी घटस्थापनेच्या आठ दिवस आधी मूर्तींची बुकिंग होत असते. यंदा बुकिंगलाही कोणीच आले नाही. तीनशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत त्यांची विक्री झाली. आज १० टक्केही मूर्तीची विक्री झाली नसल्याचे मूर्तिकार अशोक पेंढारकार यांनी सांगितले. 

रास-दांडियाचा कार्यक्रमही रद्द 
नवरोत्सवात शहरात प्रमोद राठोड, आमदार संजय शिरसाट, आमदार अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, मनसे, शिवसेना, भाजप यांच्यातर्फे रास दांडियाचे कार्यक्रम घेण्यात येतात. यंदा कोरोना असल्याने सर्व आयोजकांनी रास दांडियाचे कार्यक्रम रद्द केले आहेत.

(Edited by Pratap Awachar) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com