सैबेरीयातून आलेले पाहुणे रमले जायकवाडीत 

flemingo.jpg
flemingo.jpg

औरंगाबाद : पाणथळ जागेवर बाकदार मान आणि विशिष्ट प्रकारची रचना असलेल्या फ्लेमिंगोचे गेल्या तीन चार वर्षांपासून जायकवाडी पक्षी अभयारण्यात येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रशियातील सैबेरीया मुळ अधिवास असलेले फ्लेमिंगो पाहुणे म्हणून भारतात आले. त्यांपैकी काही पक्षी जायकवाडीच्या जलाशयावरच रमले आहेत. 

त्यांचे काही थवे यंदा जायकवाडी, पिंपळवाडीकडील पाणथळ जागांवर पाहायला मिळत आहेत. मात्र दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणारे फ्लेमिंगो आता कमी झाल्याची खंत पक्षिप्रेमींनी व्यक्त केली. लाल, गुलाबी रंगाचे खालच्या भागाचा रंग असलेल्या फ्लेमिंगोंचे आकाशात थव्याने उडतानाचे विहंगम दृश्‍य मनाला आनंद देते. 

फ्लेमिंगो किंवा रोहित नावाने ओळखला जाणारे हे पक्षी सामाजिक वातावरणात वावरणारे असल्याने ते थव्याने राहतात. किमान १५ ते २५ पक्षांचा त्यांचा थवा असतो. त्यांच्या शरीराचा खालचा भाग, पायांच्या पिसांचा रंग गुलाबी किंवा लाल भडक असतो ते उडताना लाल भडक दिसतात त्यामुळे त्यांना अग्नीपंखीही म्हणतात. दरवर्षी पैठणजवळील जायकवाडी पक्षी अभयारण्यात फ्लेमिंगोंचे थवे पक्षिप्रेमींना खुणावतात. जायकवाडी जलाशयाचे खरे आकर्षण फ्लेमिंगो आहेत. मात्र गेल्या तीन चार वर्षांपासून इथे येणाऱ्या फ्लेमिंगोंची संख्या कमी होत आहे. 

पक्षीप्रेमी डॉ. किशोर पाठक म्हणाले, फ्लेमिंगो उथळ पाण्याच्या ठिकाणी राहतात. त्यांना तिथे चांगले अन्न मिळत असते त्यामुळे ते पाणथळ जागेवर राहतात. मात्र गेल्या चार वर्षांपासून त्यांचे प्रमाण कमी होत आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातकडेही चांगला पाऊस होत असल्याने ते तिकडे जात आहेत. मासेमारीला बंदी असतानाही जायकवाडी धरणात अवैध मासेमारी सुरू असल्याने याचाही या पक्षांच्या मुक्त संचार करण्यावर परिणाम होत आहे. ज्या जायकवाडी, पिंपळवाडीकडील भागाकडे फ्लेमिंगो असतात त्या बाजूला पाणी उपसा करण्यासाठी जॅकवेल करण्यात आल्या आहेत. तसेच आजूबाजूच्या गावातून, शहरातून सांडपाणी जलाशयात मिसळून पाणी प्रदूषित होत असल्याचा परिणाम फ्लेमिंगोंच्या संख्येवर झाल्याचे मत व्यक्त केले. 

अल्गीमुळे खुलतात रंग   
डॉ. पाठक म्हणाले, चांगली वाढ झालेल्या फ्लेमिंगोचा रंग फिकट गुलाबी , लाल असतो. त्याला चांगले आणि मुबलक अन्न मिळाल्याने यांचा रंग अधिक खुलतो. त्याची आकड्यासारखी मान, विशिष्ट आकाराची चोच. ती पूर्णपणे पाण्यात बुडवून खाद्य मिळवतो. शैवाल, पाणवनस्पती, बिया, पाणकीटक, लहान मासे, कोळंबी, खेकडे व शिंपले हे फ्लेमिंगोचे मुख्य खाद्य आहे. जायकवाडी, सुखना धरणावरच्या पाणथळ जागांवर फ्लेमिंगोंचे थवे पाहायला मिळतात. या ठिकाणचे स्टिरोलीन शैवाल (अल्गी) त्यांना आवडते. त्यांनी खाल्लेल्या प्राणी-प्लवक, वनस्पती-प्लवकातील कॅरोटिनॉइड प्रथिनांमुळे रंगद्रव्ये तयार होतात आणि या रंगद्रव्यांमुळे शरीराचा रंग गुलाबी दिसतो. 

कच्छच्या रणात करतात दोघेही पिलाचे संगोपन 
विणीचा हंगाम सुरू होण्याआधी या वसाहतींमध्ये २०–२५ पक्ष्यांचे लहानलहान गट तयार करून ते स्थलांतर करतात. तर वय झालेल्या ज्या फ्लेमिंगोंना स्थलांतर करायचे नसते ते जिथे बारमाही पाणी उपलब्ध असते त्या ठिकाणीच मुक्काम ठोकतात. गुजरातमधील कच्छच्या रणात विणीच्या हंगामात फ्लेमिंगो मोठ्या संख्येने जमतात. तिथे मडक्यासारखी घरटी तयार करून त्यात अंडी घालतात. जवळजवळ महिनाभर ते अंडे नर-मादी मिळून उबवितात. पिलांचा रंग भुरकट लाल असतो. पिलाचे संगोपन नर-मादी मिळून करतात. पिल्लू चांगले मोठे होईपर्यंत ते कच्छमध्येच राहतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com