तक्रारदाराने चकरा मारुन आत्महत्या केली, तेव्हा कुठे ‘माणूसकीलेस’ पोलिस जागे झाले, अन्....

Crime
Crime

औरंगाबाद: चार लाखांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली, मात्र पोलिसांनी केराची टोपली दाखविली. तक्रार देऊन महिना झाला तरीही पोलिस मात्र कारवाई करेनात, त्यामुळे खचलेसल्या सुरेश पाटील यांनी विषारी औषध पिऊन स्वतःला संपविले. त्यांच्या आत्महत्येनंतर मात्र ‘माणूसकीलेस’ पोलिसांना जाग आली, अन गुन्हेगाराला पकडून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना असे किती बळी घ्यायचेत, आता गुन्हा दाखल करुन जीव परत येणार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

महिनाभरापूर्वी पोलिसात तक्रार दिल्यानंतरही गुन्हेगारांविरुध्द कारवाई न केल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या तक्रारदाराने शेवटी आत्महत्येचा केली, त्यानंतर पोलिस खडबडून जागे झाले. मंगळवारी सकाळी तक्रारदाराचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच गुन्हेगाराला पकडून त्याच्याविरुध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पण तक्रारदार पोलिस ठाण्यात चकरा मारत होता. तेव्हा मात्र त्याच्या अर्जाला केराची टोपली दाखवणाऱ्या पोलिस विभागाविरोधात मनसेने रोष व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मुलींचा विवाह केल्यानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या सुरेश शेकुजी पाटील (५३, रा. सुयोग कॉलनी, पदमपूरा) हे खडकेश्वर येथील डिजीटल बॅनर तयार करणाऱ्या एका कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करत होते. त्यांची नोव्हेंबर २०१९ मध्ये संजय गोविंदराव साबळे (रा. शिवराई, ता. गंगापूर) याच्याशी ओळख झाली. साबळे हा पाटील यांच्या घरी गेला असता त्याला पाटील यांनी सध्या आपण आर्थिक अडचणीत असल्याचे सांगितले. तेव्हा साबळेने त्यांना आपले भावजी शिडीर्तील एका बँकेचे संचालक आहेत. त्यांना सांगून २५ लाखांचे कर्ज काढून देतो असे म्हणाला.

मात्र, त्यासाठी पाच लाख रुपये खर्च येईल असेही त्याने सांगितले. तर ही रक्कम टप्प्या-टप्प्याने दिली तरी चालेल असेही आवर्जुन सांगितले. त्याचवेळी त्याने पाटील यांच्याकडून बाबा पेट्रोल पंप येथील एसबीआय बँकेच्या शाखेचे दोन कोरे धनादेश, दोन फोटो, आधार व पॅन कार्ड नेले. त्यानंतर वेळोवेळी घरी येऊन साबळेने पाटील यांच्याकडून एक लाख ५५ हजार रुपये नेले. कालांतराने साबळेचा पुतण्या प्रफुल्ल नंदु साबळे (रा. भवानीनगर, जुना मोंढा) हा देखील पैसे घेण्यासाठी येऊ लागला. पाटील यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती.

त्यांनी क्रेडिट कार्डमधील ६२ हजार रुपये दोनवेळा साबळेला दिले. अर्धी रक्कम पोहोच झाल्यानंतर पाटील यांनी साबळेकडे विचारणा केली. तेव्हा त्याने आणखी पैशांची आवश्यकता आहे असे सांगितल्यामुळे त्याला गुगल-पे, फोन-पेव्दारे एक लाख ५३ हजार रुपये देण्यात आले. याशिवाय ५० हजार रुपये रोखीने देण्यात आले. साबळेला चार लाख २० हजार रुपये पोहोचल्यानंतरही त्याने कर्ज काढून देण्यासंबंधी कोणतीही हालचाल केली नसल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यामुळे पाटील यांनी त्याच्याकडे तगादा सुरु केला. तेव्हा साबळेने त्यांना आज-उद्या म्हणत वेळ मारुन नेण्यास सुरूवात केली. 

साबळेच्या उलट्या बोंबा अन् धमकी 
कर्ज देण्याचे आमिष दाखवून साबळेने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर पाटील दाम्पत्याने त्याचे घर गाठले. त्यावेळी साबळे व त्याच्या पत्नीने आठ दिवसात बँकेतून कर्ज काढून देतो असे आश्‍वासन दिले. त्याचवेळी दोघांनी पाटील दाम्पत्याला आपल्या घरी का आले असेही धमकावले. तेथून परतल्यानंतर पाटील वेळोवेळी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधत होते. मात्र, तो बोलत नव्हता. 

अखेर टोकाचा घेतला निर्णय 
पाटील यांनी महिनाभरापूर्वी वेदांतनगर पोलिस ठाण्यात साबळे व त्याचा पुतण्या प्रफुल्ल यांच्याविरुध्द फसवणुकीचा तक्रारी अर्ज दिला होता. आत्महत्येच्या तीन दिवस अगोदर देखील पाटील यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे यांची भेट घेऊन उपनिरीक्षक तडवी यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंतीही केली होती.

मात्र, गुन्हा दाखल होत नसल्याचे पाहून सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास पाटील यांनी बाथरुममध्ये प्रोफेक्स सुपर नावाचे विषारी औषध सेवन केले. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तात्काळ घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

मृत्यूपुर्व जवाबही नाही 
पाटील यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर सोमवारी सकाळी घाटीतून एमएलसी पाठविण्यात आली नाही. ज्यावेळी वेदांतनगर पोलिसांनी घाटी पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा घाटी प्रशासनाने एमएलसी पाठविण्याचे राहून गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर मंगळवारी थेट पाटील मयत झाल्याचे कळविले. त्यामुळे पोलिसांना पाटील यांचा मृत्यूपुर्व जवाब नोंदवता आला नाही. 

मुलाने दिली तक्रार, अन गुन्हा दाखल... 
पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी निरीक्षक रोडगे यांना कारवाई का नाही यासंदर्भात विचारणा केली. त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संकेत शेटे व जय भगवान बाबा महासंघाचे जिल्हाध्यक्ष योगेश खाडे यांनी पोलिस निरीक्षकांना धारेवर धरत गुन्हा दाखल केला नाही. तर ठाण्यासमोर मृतदेह आणू असे सांगताच पोलिसांनी तत्परतने साबळेविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच त्याला तात्काळ अटकही केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com