दहा रुपये घेऊन सुरू केला व्यवसाय, आज उलाढाल दीड कोटी 

Aurangabad news
Aurangabad news

गंगापूर : चिकाटी आणि मेहनत करण्याची जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही याचा प्रत्यय शहरातील सुभाष सीताराम पवार या उद्योजकाकडे बघून येतो. त्यांनी दहा रुपये उसने घेऊन सुरू केलेल्या व्यवसायाची आज दीड कोटीच्या घरात उलाढाल आहे. त्यांनी पावडर कोटिंग आणि अनोडायझिंगचा कारखाना उभारला आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांत त्यांनी बनविलेला माल विकला जातो. त्यांनी या माध्यमातून आठ जणांना रोजगारही दिला आहे. 

श्री. पवार मूळचे धुळे (खानदेश) येथील मोलमजुरी करणारे कुटुंबातून आहेत. त्यांचे मोठे भाऊ विजय पवार गंगापूर येथे तलाठी होते. सुभाष यांचे विजय यांच्याकडेच मालुंजा व गंगापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण झाले. १९७४ मध्ये दहावीनंतर व औरंगाबादेत चित्रकलेचे शिक्षण घेतले. दरम्यान, ते भावापासून वेगळे झाले. लग्न होऊन गंगापूर शहरात परतले.

राहायला घर आणि हाताला काम नाही अशा परिस्थितीत शहरातील वर्गमित्र रमेश जाधव यांच्या आईने राहण्याची व्यवस्था केली. पंधरा दिवस जेवण दिले. १९८० मध्ये व्यापारी श्री. नावंदर यांच्याकडून व्यवसायासाठी दहा रुपये उसने घेतले. दहा रुपयांत शेंगदाणे, गूळ आणून पत्नी रंजना यांनी गूळपट्टी तयार केली. ती शहरातील दुकानदारांना पुरवली. पुढे हा व्यवसाय वाढला. तीन रुपये शेकड्याप्रमाणे शहरातील दुकानदारांना ते गूळपट्टी पुरवत.

वर्ष १९८८ मध्ये शहरात प्रथमच फोटो फ्रेमचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. भाड्याने सायकल घेऊन रोज तीस ते चाळीस किलोमीटर प्रवास करायचे. शासकीय कार्यालयात महापुरुषांची फोटो फ्रेम विकल्या. काळानुसार व्यवसायात बदल करीत अल्युमिनियमचा व्यवसाय करण्यासाठी स्टेट बँकेकडून पाच हजारांचे कर्ज घेतले. व्यवसाय वृद्धीसाठी १९९२ ते १९९५ वर्षापर्यंत कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवले.

१९९५ मध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीज योजनेतून २४ लाखांचे कर्ज मंजूर झाले; पण जागेअभावी मंजूर कर्ज मिळत नव्हते. शहरातील एका भल्या माणसाने फक्त वीस रुपयांच्या इसार पावतीवर बारा गुंठे जागेचे खरेदी खत करून दिले. पवार इंडस्ट्रीजमध्ये आठ तरुणांना रोजगार दिला. शिवाय व्यवसायासाठी तालुक्यात बारा तरुणांना प्रोत्साहित केले. वर्ष २०१२ मध्ये जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 

ती काळ रात्र आजही आठवते 

श्री. पवार सांगतात, वर्ष १९८० मध्ये गाजगाव येथून फ्रेम विकून सायंकाळी सहाच्या सुमारास सायकलवर आंबेलोहळ जात असताना खूप जोराचा पाऊस झाला. पांदी पूर्ण पाण्याने भरली असताना छाती एवढ्या पाण्यातून वाट काढत सायकल डोक्यावर घेऊन रात्री साडेबारा वाजता आंबेलोहळ गाठले. जणू ती काळरात्रच होती. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती भाऊसाहेब बनकर यांनी व त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडला. त्या माऊलीने पिठलं-भाकर करून खाऊ घातली, अशी आठवण त्यांनी सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com