बेकायदा बांधकामावर कारवाईसाठी इमारतीवरुन एकाचा उडी मारण्याचा प्रयत्न, दुसऱ्याने अंगावर डिझेल घेतले ओतून

Aurangabad Today News
Aurangabad Today News

औरंगाबाद : काल्डा कॉर्नर येथील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची मागणी तीन वर्षांपासून पॅंथर सेनेतर्फे केली जात आहे. मात्र महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागातर्फे चालढकल केली जात असल्याचा आरोप करत नरेश पाखरे यांनी महापालिकेच्या मुख्यालयातील इमारतीवरून उडी मारण्याचा तर जयकिशन कांबळे यांनी अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने शुक्रवारी (ता.पाच) खळबळ उडाली. सिटी चौक पोलिसांनी वेळीच धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.


काल्डा कॉर्नर येथे सारा प्राईडजवळ कैसरबानो युसुफ मुकाती यांची इमारत आहे. या इमारतीचे बांधकाम अनधिकृत असून, कारवाईची मागणी पॅंथर सेनेचे जिल्हाप्रमुख नरेश पाखरे यांनी महापालिकेकडे केली होती. आठ फेब्रुवारी २०१९ रोजी पदनिर्देशित अधिकारी आर. एस. राचतवार यांनी संबंधिताला नोटीस बजावून बेकायदा बांधकाम स्वतः होऊन निष्काशित करावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली जाईल. कारवाईचा खर्च आपल्याकडून वसूल करण्यात येईल, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर मात्र प्रशासनातर्फे चालढकल सुरू करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख रवींद्र निकम या बेकायदा बांधकामाला पाठीशी घालत आहेत.

असा आरोप पाखरे यांनी केला होता. बांधकामावर दोन दिवसांत कारवाई झाली नाही तर आत्मदहन करण्यात येईल, अशा इशारा त्यांनी निवेदनाव्दारे महापालिकेला दिला होता. त्यानंतरही कारवाई झाली नसल्याने शुक्रवारी (ता.पाच) सकाळी नरेश पाखरे व जयकिशन कांबळे महापालिकेत आले. महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणा देत पाखरे यांनी मुख्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जयकिशन कांबळे यांनी अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली. सिटी चौक पोलिसांनी तातडीने महापालिकेत धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले. बेकायदा बांधकामावर कारवाई करायला अतिक्रमण हटाव विभाग तयार नाही. त्यामुळे आम्ही आत्मदहनाचा आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले.

हेही वाचा - ग्रामीण भागातील शाळा २० मार्चपर्यंत बंद; १०वी व १२ वीच्या वर्गांना मात्र परवानगी

निकम यांची चौकशी करण्याची मागणी
महापालिका प्रशासकांना दिलेल्या निवेदनात रवींद्र निकम यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निकम व कैसरबाने यांचे पती युसूफ मोकाती यांच्यात आतापर्यंत किती वेळा फोनवर संभाषण झाले आहे, याचा पोलिसांकडून तपास करण्यात यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com