चारशे रुपयांसाठी पाचशे रुपयांचे खाते उघडणार कसे ?

शेखलाल शेख
मंगळवार, 30 मे 2017

  •  मोफत गणवेशासाठी पाल्यास आईसोबत संयुक्त खाते उघडावे लागणार
  •  जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांच्या अडचणीत वाढ
  •  झिरो बॅलेन्सवर खाते उडण्यास बॅंका करतात टाळाटाळ

औरंगाबाद: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रयरेषेखाली मुले, सर्व मुलींना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश देण्यात येतो. आता सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात रोख स्वरुपात रक्कम थेट बॅंक खात्यात दिली जाणार असली तरी पाल्य आणि आईचे असे संयुक्त बॅंके खाते उघडण्याच्या शिक्षण विभागाच्या आदेशाने पालक चांगलेच संकटात सापडले आहे.

बॅंकांनी विद्यार्थ्यांना झिरो बॅलेन्सवर खाते द्यावे असे आदेश असले तरी बॅंकांना किमान पाचशे रुपये भरले तरच खाते उघडतात असा आजपर्यंतचा पालकांचा अनुभव असल्याने आता दोन गणवेशाच्या चारशे रुपयांसाठी पालकांची पाचशे रुपयांचे राष्ट्रीयकृत, ग्रामीण बॅंकेत खाते कसे उघडावे हा प्रश्‍न पालकांना पडला आहेत.
त्यातच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थींना गणेवश वाटप करण्याच्या सूचना असल्याने मुख्याध्यापक, शिक्षक सुद्धा अडचणीत आले आहे. कोणत्याही बॅंकेत गेले तर खाते उघडण्यासाठी पाचशे रुपये खात्यात ठेवण्याचे बॅंकेतील कर्मचारी सांगतात आता चारशे रुपयांसाठी पाचशे रुपयांचे खाते उघडणार तरी कोण असा प्रश्‍न उपस्थितीत झाला आहे.

विद्यार्थी आणि आईच्या नावे संयुक्त खाते उघडा
विद्यार्थ्यांना वर्षातून दोन गणवेश खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे रुपये दिले जातात. या वर्षी विद्यार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम दिली जाणार आहे. राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुबई यांनी पत्र पाठवून शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेतील एससी, एसटी, सर्व मुली आणि दारिद्रयरेषेखालील विद्यार्थी यांनी गणवेश दिला जातो. अशा पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक बोलावून विद्यार्थी व आईच्या नावाने संयुक्त बॅंक खाते उघडण्याची माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांची आई हयात नसल्यास इतर पालक-अभिभावक यांच्या नावाने खाते उघडावे लागणार आहे. विशेष म्हणजे खाते उघडण्यासाठी आधारलिंक अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच जे नव्याने प्रवेश घेणार आहे अशा पालकांना सुद्धा याबाबती माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे.

झिरो बॅलेन्सवर खाते मिळेना
अनेक पाल आता नव्याने खाते उघडण्यास तयार नाहीत. या अगोदरच अनेक पालकांनी विद्यार्थ्यांच्या नावासह संयुक्त खाते उघडले आहे. आता आईच्या नावाने संयुक्त खाते उघडण्यास पालक तयार नाही. खाते उडतांना ते राष्ट्रीयकृत, ग्रामीण, शेड्युल बॅंकेत उघडण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बॅंकांनी विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्सवर खाते द्यावे असे आदेश आहेत. मात्र बहुतांश बॅंकेत गेल्यावर झिरे बॅलेन्सवर बॅंका खाते देत नाहीत. यामध्ये किमान पाचशे रुपये तरी ठेवावे असे सांगण्यात येते. खाते उघडतांनाच पालकांना पाचशे रुपये भरावे लागणार आहे. आणि गणवेशाची रक्कम हातात मिळेल फक्त चारशे रुपये. त्यामुळे आता नव्याने संयुक्त खाते उघडणे आवश्‍यक आहे.

मागील वर्षी दिले होते थेट गणवेश
सन 206-17 या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यात गणवेशाची रक्कम थेट जमा करण्यात आली होती. मुख्याध्यापक, शिक्षकांनी बचत गटांमार्फत गणवेश शिलाई केले. त्यामुळे बहुतांश शाळेत विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळाले होते. आता आईच्या नावाने संयुक्त खाते उघडून रक्कम खात्यात दयायची असल्याने मुख्याध्यापकच अचडणीत आले आहे. बहुतांश पालक संयुक्त खाते उघडण्यास तयार नाहीत. त्यामुळे ही रक्कम खात्यात देणार तरी कशी असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे.


अशाने मोफत गणवेश योजनेचा बट्टयाबोळ- विजय साळकर (कार्याध्यक्ष, शिक्षक समिती, औरंगाबाद)
विद्यार्थ्यांना शंभर टक्के गणवेश मिळण्यासाठी विद्यार्थी आणि आईच्या नावे संयुक्त खाते उघडण्याची अट रद्द करण्यात यावी. अशा अटी घालुन या योजनेचा बट्ट्याबोळ होणार आहे. मागील वर्षी प्रमाणेच ही योजना ठेवावी नसता या वर्षी गणवेश वाटप करणेच अवघड होणार आहे.


ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: aurangbad news zp school and bank account