पत्र लिहा, बक्षीस जिंका : टपाल विभागाची निबंध स्पर्धा

सुशांत सांगवे
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

टपाल विभागाने विद्यार्थ्यांबरोबर नागरिकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. विशेष म्हणजे यात सहभागी होऊन उत्तम लेखन करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीसही दिले जाणार आहे.

लातूर : ई-मेल आणि सोशल मीडियाच्या अति वापरामुळे पत्र लेखन करणे आणि नातेवाईकांना पत्र पाठविण्याची परंपरा इतिहास जमा होत चालली आहे. अशा काळात पुन्हा एकदा पत्र लिहिण्याची मजा अनुभवता यावी, त्याची सवय लागावी म्हणून टपाल विभागाने विद्यार्थ्यांबरोबर नागरिकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. विशेष म्हणजे यात सहभागी होऊन उत्तम लेखन करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीसही दिले जाणार आहे.

पत्र लेखन कमी झाल्यामुळे अनेक टपाल पेट्या अक्षरश: ओस पडत आहेत. या बाबींचा विचार करून टपाल विभागाने निबंध स्पर्धा आयोजित करून नागरिकांचे टपाल विभागाकडे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर अशा दोन स्तरावर ही स्पर्धा होणार आहे. राज्यस्तरीय पातळीवरील स्पर्धेत २५ हजार रुपयांचे पहिले बक्षीस, १० हजार रुपयांचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस तर पाच हजार रूपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस दिले जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत ५० हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस, द्वितीय बक्षीस २५ हजार रुपयांचे तर तृतीय बक्षीस १० हजार रूपयांचे दिले जाणार आहे.

प्रिय बापू...

अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची २ ऑक्टोबर रोजी १५० वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ‘प्रिय बापू, आप अमर हैं’ हा निबंध स्पर्धेचा विषय देण्यात आला आहे. १८ वर्षांपर्यंत आणि १८ वर्षांवरील व्यक्ती अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार असून ५०० शब्दांपर्यंत निबंध लिहायचा असेल तर आंतरदेशी पत्राचा वापर करायचा आहे.

एक हजार शब्दांपर्यंत निबंध लिहायचा असेल तर तो कोऱ्या कागदावर लिहून लिफाफाच्या माध्यमातून स्पर्धकांनी पाठवायचा आहे. या स्पर्धेत नागरिकांबरोबरच अधिकाधिक शाळा-महाविद्यालयांनी सहभागी होऊन मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई या पत्यावर पत्र पाठवावे, असे आवाहन टपाल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३१ डिसेंबरपर्यंत सहभागी होता येईल, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - 

बीडमधून धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके की संदीप क्षीरसागर?

मेंदू न उघडता शक्य आहे ब्रेन ट्यूूमरची शस्त्रक्रिया

बालवारकरी जोपासताहेत 200 वर्षांची परंपरा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Competition by India Post for Students and People