चार आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी 

महेश गायकवाड
Thursday, 9 April 2020

कोरोनाबाधित महिलेशी उपचारादरम्यान संपर्क आलेल्या १७ पैकी चार आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी (ता.नऊ) देण्यात आली.

जालना -  कोरोनाबाधित महिलेशी उपचारादरम्यान संपर्क आलेल्या १७ पैकी चार आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी (ता.नऊ) देण्यात आली. तर दुखीनगर भागातील १० हजार ४० व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

शहरातील दुखीनगर भागातील ६५ वर्षीय महिलेचा अहवाल सोमवारी (ता.सहा) कोरोना पॉझिटिव्ह आला. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून या भागात २० आरोग्य पथकांतर्फे एक हजार ९१९ कुटुंबांतील दहा हजार ५० व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

हेही वाचा : बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील १७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान बाधित महिलेशी निकटचा संपर्क आला होता. त्यामुळे त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यापैकी चार कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. 

विलगीकरण कक्षात आठ जण नव्याने दाखल 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात गुरुवारी (ता.नऊ) आठजण नव्याने दाखल करण्यात आले आहे. सध्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्यांची संख्या १२६ झाली आहे. 

जिल्ह्याला १६ कोटी ३० लाख रुपयांचा निधी

जालना  जिल्ह्यातील जनतेला अधिक चांगल्या प्रमाणात आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातूनजिल्ह्याला १६ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर  करण्यात आला आहे. यात अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे नूतनीकरण व निवासस्थानांच्या कामांसाठी चार कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. 

जिल्ह्यात विविध कामे होणार

जिल्हा रुग्णालयाच्या वर्ग एक व दोन निवासस्थांनाची दुरुस्ती, इमारतीची व परिसरातील ड्रेनेज व अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी आठ कोटी ७२ लाख व घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालयातील कक्षाचे बांधकाम, परिसर सुधारणा, मुख्य इमारत व निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report send in Jalna