कोरोनातही जालन्यात रस्त्यांवर दाटीवाटी 

उमेश वाघमारे 
Thursday, 30 July 2020

कोरोनातही जालन्यातील विविध रस्त्यांवर दाटीवाटी पाहायला मिळत आहे. बाजारपेठ, रस्त्यावर तुफान गर्दी असून, डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचे चित्र बुधवारी (ता.२९) दिसून आले. 

जालना -  कोरोनातही जालन्यातील विविध रस्त्यांवर दाटीवाटी पाहायला मिळत आहे. बाजारपेठ, रस्त्यावर तुफान गर्दी असून, डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचे चित्र बुधवारी (ता.२९) दिसून आले. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार पार झाली आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांपैकी तब्बल ८५ टक्के रुग्ण हे एकट्या जालना शहरात आहेत; मात्र तरी देखील नागरिक कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेताना दिसत नाहीत.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी किमान मास्कसह फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अपेक्षित आहे. मात्र, शहरातील नागरिकांना मागील चार महिन्यांच्या काळात अनेकदा लॉकडाउन होऊनही फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे नेमके काय असते याचे भान राहिलेले नाही. परिणामी बाजारपेठेत रोजच नागरिकांची खरेदीसाठी तुफान गर्दी आहे. परिणामी कोरोना प्रसाराचा धोका कमी होण्यापेक्षा अधिक वाढला आहे. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

चीन येथून आलेला कोरोना देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचला आहे. जालना जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर मागील चार महिन्यांत जिल्ह्यात तब्बल दोन हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्न करीत आहेत; मात्र, तरी देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. शहरातील वाढता कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी अनेकदा लॉकडाउन लागू करण्यात आले; तसेच मास्क वापरासह फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात. मात्र, अनेक जालनेकरांवर काहीच फरक पडलेला दिसत नाही. 

चार लाख ३९ हजारांचा दंड वसूल 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलिस तसेच जिल्हा प्रशासनामार्फत संयुक्तरीत्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (ता.२९) तब्बल एक हजार ९६९ व्यक्तींकडून चार लाख ३९ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता पोलिस तसेच जिल्हा प्रशासन कठोर कारवाई करीत आहे. यामध्ये बुधवारी जालना तालुक्यातील २३७ व्यक्तींकडून ९१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बदनापूर येथील ३४७ व्यक्तींकडून ६६ हजार ७००, भोकरदन येथील १८० व्यक्तींकडून ३६ हजार रुपये, जाफराबाद येथील २०६ व्यक्तींकडून ४१ हजार ५००, अंबड येथील २३७ व्यक्तींकडून ६६ हजार २५०, घनसावंगी येथील ८७ व्यक्तींकडून ५ हजार ७००, परतूर येथील २९ व्यक्तींकडून ४ हजार ९०० रुपये तर मंठ्यामध्ये ६४६ व्यक्तींकडून १ लाख २७ हजार अशा प्रकारे एकूण १ हजार ९६९ व्यक्तींकडून ४ लाख ३९ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, शारीरिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा; तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds on the streets in Jalna