आधी अतिवृष्टीने नेले, आता बहरलेल्या हळदीवर करपाचा घाव

Halad.jpg
Halad.jpg

भोकरदन (जालना) : तालुक्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करीत आहे. काही शेतकऱ्यांनी हळदीचे पीक घेण्याचा नवा प्रयोग यशस्वी केला; मात्र अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यात आता वातावरणातील बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
हळद लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी मका, कापूस, सोयाबीन या पिकांबरोबर हळद लागवडीकडे वळत आहे. त्यामुळे दरवर्षी हळूहळू हळद लागवडीचे क्षेत्र वाढत असल्याचे चित्र आहे. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु मागील महिन्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे खरिपातील मका, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

हळद पिकासाठीही पहिल्यापासून अत्यंत पोषक वातावरण असल्यामुळे हळद पीक जोमात बहरले होते. मात्र, अति पावसाचा हळद पिकालाही मोठ्या फटका बसला. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले. वातावरणात अधिक काळ आर्द्रता असल्यामुळे हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे हळद उत्पादक शेतकरी सांगतात. हळदीवर करपा रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हतबल झाला आहे. कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळावे अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

करपा रोगाची लक्षणे.. 
हळदीच्या पानांवर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. कालांतराने हे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पान करपून जाते. पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे ठिपके दिसून येतात. तसेच करपा रोगामुळे पाने वाळून जातात. 


मागील काही वर्षांपासून हळदीचे पीक घेत आहे. यावर्षी दीड एकरात लागवड केली. सुरुवातीला झालेल्या पावसाने यंदाचे वर्ष चांगले राहील अशी आशा होती. मात्र, अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात हळदीचे कंद परिपक्व होत असताना करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यंदा हळद उत्पादनातही घट होणार आहे. -अशोक आहेर, शेतकरी, मुठाड 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com