गड, मंदिरांवर फक्त घोषणा, कामाचा पत्ताच नाही - धनंजय मुंडेंचा टोला 

दत्ता देशमुख
Saturday, 18 January 2020

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील सरकारच्या कामाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. गड, मंदिरांसाठी फक्त निधी घोषित झाला, कामाचा पत्ताच नाही. तत्कालीन पालकमंत्री (पंकजा मुंडे) यांच्या काळात हा प्रकार इतका सहज का घेतला गेला, असा प्रश्‍न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. 

बीड - जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायणगड, श्रीक्षेत्र गहिनीनाथगड, ज्योतिर्लिंग वैद्यनाथ आदी ठिकाणी नुसते भूमिपूजन झाले. विकासकामांचा अद्याप पत्ता नाही, ना घोषित केलेला निधी मिळाला, असा आरोप पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.

नियोजन समितीच्या बैठकीनंतर शुक्रवारी (ता. 17) श्री. मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. मुंडे म्हणाले, की तत्कालीन पालकमंत्र्यांना मागच्या नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर निधीपैकी फक्त 40 टक्के निधी खर्च करता आला आहे. भविष्यात हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मागच्या काळात हा प्रकार इतका सहज का घेतला? अनेक कामांना प्रशासकीय मान्यता नसून काहींचे प्रस्तावही नाहीत. दीड कोटीची तरतूद असलेल्या औषधी खरेदीचा साधा प्रस्तावही नसल्याचे सांगून त्या काळात या गोष्टी इतक्‍या सहज का घेतल्या? असेही मुंडे म्हणाले. 

हेही वाचा ..तर संजय राऊतांचं तोंड वंगणानं काळं करू

गड-मंदिरांवर नुसतेच भूमिपूजन 
श्रीक्षेत्र नारायणगडावर 25 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन झाले; परंतु केवळ तीन कोटींच्या भक्त निवासाचेच काम सुरू आहे. पुढील निधी नाही आणि कामही नाही. गहिनीनाथगडावरही फक्त स्वच्छतागृहाचे काम सुरू असून, निधीची घोषणा केलेल्या आणि भूमिपूजन केलेल्या गाळ्यांबाबतही तोच प्रकार आहे.

हेही वाचा - बीड जिल्ह्याला आता नऊ आमदार, संजय दाैंड बिनविरोध

परळी येथील वैद्यनाथ देवस्थानाच्या 133 कोटी रुपयांच्या विकास आरखड्याला मंजुरी मिळाल्याचे जाहीर करून कामांचे भूमिपूजन झाले असले तरी यातील केवळ 10 कोटींचाच निधी मंजूर असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले. 

प्रारूप आराखड्यास मंजुरी 
बैठकीत 2020-21 या वर्षाच्या 336 कोटी 69 लाख लाख 91 हजार रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत (सर्वसाधारण) 242 कोटी 83 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 92 कोटी 12 लाख, ओटीएसपीसाठी एक कोटी 74 लाख अशा वित्तीय तरतुदीचा आराखडा मंजूर करण्यात आला. याशिवाय राज्य शासनाच्या 22 तारखेला होणाऱ्या बैठकीत अतिरिक्त 99 कोटी रुपयांची मागणी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा - सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, आमदार प्रकाश सोळंके, सुरेश धस, विनायक मेटे, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर, जिल्हा नियोजन समितीचे तज्ज्ञ सदस्य शंकरराव नागरे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा नियोजन अधिकारी बालाजी आगवणे होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde Criticizes The Previous Government