
'हात जोडतो ! अतिरिक्त ऊसामुळे आत्महत्या करु नका'
बीड : कुटूंबाला तुमची गरज आहे. प्रशासन तुमच्या सोबत आहे. अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावर शासन तोडगा काढत असून मदतही मिळेल. मात्र, आत्महत्या करु नका, हात जोडून विनंती करतो, असे भावनिक आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा (IAS Radhabinod Sharma) यांनी केले. हिंगणगाव (ता. गेवराई) येथील नामदेव आसाराम जाधव (वय ३०) या शेतकऱ्याने शेतातील दोन एकर क्षेत्रावरील ऊसाचे गाळप होत नसल्याने अगोदर ऊस पेटवून देऊन नंतर झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ११) दुपारी घडली. यानंतर शर्मा यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. (Don't Committee Suicide Due To Surplus Sugarcane, Beed District Collector Radhabinod Sharma Appeal)
हेही वाचा: अतिरिक्त ऊसाचा बळी, दोन एकर ऊस पेटवून शेतकऱ्याने घेतला गळफास
यानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. सोबत निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत होते. राधाबिनोद शर्मा म्हणाले, जिल्ह्यात ८५ हजार हेक्टरांवर ऊसाची लागडव झाली. ५५ लाख मेट्रीक टन ऊस (Sugarcane) उत्पादनाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील कारखान्यांची गाळप क्षमता पाहता ऊस अतिरिक्त राहण्याचा सुरुवातीपासून अंदाज आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळीही हा मुद्दा आला होता. त्यानंतर साखर आयुक्तांसोबतही बैठक झाल्याचे त्यांनी सांगीतले. सहकार मंत्री व पणन मंत्र्यांसह साखर आयुक्तांच्या बैठकीत जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचे नियोजन करण्यासाठी हार्वेस्टर देण्याबाबत चर्चा झाली. बीड (Beed) जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी वाहतूक अनुदानाबाबत आपण स्वत:हून शासनाला प्रस्ताव पाठविल्याचेही राधाबिनोद शर्मा यांनी नमूद केले.
हेही वाचा: मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत असताना वीजपुरवठा खंडित...
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रब्बी हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीत अतिरिक्त ऊसाच्या मुद्द्यावर सुचना दिल्या आहेत. दरम्यान, आपण स्वत: यापूर्वीच गेवराई कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. तसेच माजलगाव कार्यक्षेत्रातील तीनही कारखान्यांसोबत बैठक घेऊन नियोजनाच्या सुचना दिल्या होत्या. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी दोन - तीन कारखान्यांना ऊसाची नोंद केलेली आहे. त्यामुळे ऊस अतिरिक्त राहणार असला तरी जास्त राहणार नाही. अशा अतिरिक्त ऊसाला शासन मदत करेल, असेही राधाबिनोद शर्मा म्हणाले. या कामासाठी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
Web Title: Dont Committee Suicide Due To Surplus Sugarcane Beed District Collector Radhabinod Sharma Appeal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..