उमरग्यातील अतिक्रमणावर तात्पुरता हातोडा, नवीन वर्षात नागरिकांना मिळणार का मोकळा श्वास!

अविनाश काळे
Thursday, 31 December 2020

उमरगा शहरातून गेलेल्या जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत  वाढलेल्या अतिक्रमणाचा विळखा सैल करण्यासाठी गुरुवारी (ता.३१) सकाळपासुनच महामार्ग प्राधिकरण, पालिका, पोलिस यंत्रणेने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेले अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरू केली.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहरातून गेलेल्या जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत  वाढलेल्या अतिक्रमणाचा विळखा सैल करण्यासाठी गुरुवारी (ता.३१) सकाळपासुनच महामार्ग प्राधिकरण, पालिका, पोलिस यंत्रणेने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेले अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरू केली. दरम्यान रस्त्यातील शेड, फलक, पानटपऱ्या काढण्यात येत होत्या. मात्र ज्यांची दुकाने अथवा दुकानाच्या पायऱ्या अतिक्रमणात आहेत, त्यांना मात्र तूर्त अप्रत्यक्ष संधी दिली आहे. रस्त्यावरील हातगाडे, भाजीविक्रेते, रिक्षाचे थांबे हटविल्याने मात्र नागरिकांना रस्त्याने जाताना मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली.

 

 

उमरगा शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हातगाडेवाले, फेरीवाले, रिक्षाचे थांबे, दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हा जटील प्रश्न वर्षांनुवर्ष तसाच आहे. अतिक्रमण काढण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले. पण ते तात्पूरत्या स्वरूपात झाले. नव्याने रूजू झालेले पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी नागरिकांना अतिक्रमणाचा होणारा त्रास दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी महामार्ग प्राधिकरण, पालिका व व्यापाऱ्यांची मंगळवारी (ता.२९) बैठक घेतली होती.

 

 

 

 

अतिक्रमण हटवण्याविषयी झालेल्या चर्चेत छोट्या व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे, आठवडा बाजारा दिवशी राष्ट्रीय महामार्गावर होणारी भाजी विक्री थांबवणे, हातगाडेवाले, दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था, चारचाकी वहान थांब्यासाठी पर्यायी जागा, भाजी लिलावासाठी जागा, रिक्षासाठी पर्यायी जागा या संदर्भात चर्चा झाली होती. जुन्या सरकारी दवाखान्याच्या जागेत भाजी विक्री तर भाजी लिलाव मूळज रोडलगत असलेल्या आठवडे बाजारात होईल. दुचाकीची पार्किंग गटशिक्षण कार्यालयाच्या मैदानात असेल. असे बैठकीत ठरले. दरम्यान गुरुवारी हटविण्यात आलेल्या छोट्या व्यावसायिकांसाठी निवडण्यात आलेल्या पर्यायी जागेतील सुविधा परिपूर्ण आहेत का? या बाबीकडेही लक्ष द्यायला हवे.

 

 

 

अतिक्रमणाची मोहिम नेमकी कुणाची ?
अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी नेमकी कुणाची याबाबतची वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. एसटीपीएल कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक अजिंक्य महाडिक यांनी बाह्यवळण रस्ता झाल्याने शहरातून गेलेल्या रस्त्याची जबाबदारी पालिकेची असल्याचे तोंडी सांगताहेत. पालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर म्हणतात, हा रस्ता अजूनही पालिकेकडे हस्तांतरीत झालेला नाही, तशी प्रक्रियाही अजुन झालेली नाही. पोलिस यंत्रणेने मनुष्यबळ पुरविण्याची मागणी केल्याने कामगार मोहिमेत होते. मग मोहिम नेमकी कुणी राबविली. पोलिस यंत्रणेचाच पुढाकार होता का ? याबाबतची चर्चा आता होते आहे. दरम्यान रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे मात्र याची जबाबदारी नेमकी कुणाची, याबाबतची तर्क, वितर्क चर्चा नागरिकात होती. अतिक्रमणामुळे विस्थापित होणाऱ्या व्यवसायांना पहिल्यांदा पर्याची जागेची व्यवस्था करुन देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment Portion Demolished In Umarga Osamanabad News