
लातूर जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना बाधितांची तसेच मृतांची संख्या लक्षणीय वाढत आहे.
लातूर : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना बाधितांची तसेच मृतांची संख्या लक्षणीय वाढत आहे. आतापर्यंत १५ हजारावर बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्याचा कोरोनाचा रिक्व्हरी रेट ८४.३६ टक्के आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. तरीदेखील नागरिकांनी कोरोना संबंधीच्या उपाय योजनांचे काटेकोर पालन केले तर कोरोनापासून सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत गेली. त्या सोबतच कोरोनाचे उपचार सुरू असताना मृत्यू होणाऱ्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पाच हजार ९११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. सप्टेंबरमध्ये नऊ हजार १८८ जण कोरोना बाधित झाले होते. जिल्ह्यात रॅपिड ॲंटीजेन टेस्ट सुरू झाल्यापासून बाधितांची संख्या लक्षणीय समोर आली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली दखल, अवघ्या सहा तासांत महामार्ग दुरुस्तीस सुरवात
या टेस्टमुळे कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरवातीच्या काळातच रुग्ण समोर येऊ लागले. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटरमध्ये तातडीने उपचार करण्यास मदत झाली. याचा परिणाम रुग्ण तातडीने बरे होण्याचे प्रमाणही वाढले गेले आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता. सहा) एकूण बाधितांची संख्या १७ हजार ९७६ इतकी होती. यात १५ हजार १६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
यात आतापर्यंत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतून ९३८, उदगीरच्या सामान्य रुग्णालयातून ३१८, उदयगिरी लायन्स रुग्णालयातून ११६, उदगीरच्या जयहिंद सैनिक शाळा कोविड सेंटरमधून १८२, तोंडार पाटी (ता. उदगीर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध निवासी शाळा कोविड सेंटरमधून ३९६, लातूरच्या बारा नंबर पाटीवरील कोविड सेंटरमधून तीन हजार ४९९, मरशिवणी (ता. अहदमपूर) येथील कोविड सेंटरमधून ५७१, औसा येथील मुलांची शासकीय निवासी शाळेतून ५८०, निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातून ९२, दापका (ता. निलंगा) येथील कोविड सेंटरमधून ३४९, जाऊच्या कोविड सेंटरमधून १७८, देवणीच्या शासकीय वसतिगृह सेंटरमधून १४७, चाकूरच्या कृषी महाविद्यालयातून ३१८, बावची (ता. रेणापूर) येथील कोविड सेंटरमधून १७५, लामजना येथील सामाजिक न्याय भवनातून २९९, बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातून ८६५, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतमधून ६७१, जळकोटच्या संभाजी केंद्रे महाविद्यालयातून १७२, शिरूर अनंतपाळच्या कोविड सेंटरमधून ३०६, लातूरच्या समाजकल्याण वसतिगृहातून ७३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
परळी केंद्रातून अखेर वीज निर्मिती सुरु, तिन्ही संच कार्यान्वित
मध्यवर्ती कारागृहातून पाच तर खासगी रुग्णालयातून एक हजार ६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने रिक्व्हरी रेट ८४.३६ वर गेला आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.
संपादन - गणेश पिटेकर