आधारलिंकचा घोळ; लातूरात पाच हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लटकली

विकास गाढवे
Wednesday, 21 October 2020

आधारलिंक बँक खाते व मोबाईललिंक आधारचा अभाव; अद्ययावत माहितीसाठी शेवटची मुदत 

लातूर : आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसणे, आधारक्रमांकासी संलग्न मोबाईल बंद असणे आदींसह जिल्ह्यातील चार हजार ७०६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर होऊन ती महाडीबीटी पोर्टलवर लटकून पडली आहे. हे विद्यार्थी विविध ३७५ महाविद्यालयांचे असून, सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी महाविद्यालयांना २७ ऑक्टोबरची मुदत दिली आहे. मुदतीत संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करताच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती काही क्षणात थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सहायक आयुक्त समाजकल्याण एस. एन. चिकुर्ते यांनी ही माहिती दिली. वर्ष २०१८-२०१९ व २०१९- २०२० शैक्षणिक वर्षातील हे विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सर्व सरकारमान्य अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्‍यवृत्ती व शिक्षण शुल्‍क, परीक्षा शुल्‍क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्‍यवृत्‍ती, व्‍यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्‍यांना निर्वाह भत्ता देण्यात येतो.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यासाठी सरकारने वर्ष २०१८-२०१९ या वर्षापासून महाडीबीटी पोर्टल सुरू केले असून, या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता तर महाविद्यालयांना शिक्षण तसेच परीक्षा शुल्काची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. मात्र, अर्जांमध्‍ये आधारक्रमांक अद्ययावत नसणे, आधार क्रमांक बॅंक खात्‍याशी संलग्‍न नसणे, आधार इनअॅक्‍टीव्‍ह असणे, व्‍हाऊचर रिडीम न करणे, आधार संलग्‍न बॅंक खाते बंद असणे, विद्यार्थ्‍यांचे आधार संलग्‍न मोबाईल क्रमांक बंद असणे, विद्यार्थ्‍यांची उपस्थिती अद्ययावत करण्याकरिता अर्ज प्रलंबित असणे आदींमुळे शिष्यवृत्ती मंजूर होऊन पोर्टलवर जमा असतानाही ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचे सहायक आयुक्त चिकुर्ते यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

...तर क्षणात शिष्यवृत्ती जमा 
शिष्यवृत्ती लटकलेल्या विद्यार्थ्यांची यादी कारणांसह महाविद्यालयांना पाठवली असून, पोर्टलवर महाविद्यालयाच्या लॉगीनमध्येही यादी उपलब्ध आहे. त्यानुसार महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करून माहिती अद्ययावत करताच शिष्‍यवृत्तीची रक्‍कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्‍यात आपोआप जमा होणार आहे. तसे महाडिबीटी पोर्टलने सरकारला कळविल्याचे सहायक आयुक्त चिकुर्ते यांनी सांगितले. २७ ऑक्टोबरपर्यंत त्रुटी पूर्तता करण्यास व माहिती अद्ययावत करण्याची संधी असून, मुदती प्रक्रिया न केल्यामुळे शिष्यवृत्ती न मिळाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five thousand student no scholarships Latur news