बीडच्या मुलीचा असाही संघर्ष, ऊसतोड मजूर आई-वडील परजिल्ह्यात, गावाकडे ती सांभाळतेय भावंडं

रामदास साबळे
Sunday, 19 April 2020

संचारबंदीत अडकून पडलेल्या चौदावर्षीय शाळकरी चिमुकलीचा गावी दोन भावंडांना सांभाळण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष मन हेलावून टाकणारा आहे. सध्या तांड्यावर पाणीटंचाई तीव्र झाली आहे. अशा परिस्थितीत तिला हंडाभर पाण्यासाठी तीन परस खोलीच्या विहिरीत दोरीच्या साहाय्याने उतरून वाटीने पाण्याचा हंडा भरण्यासाठी तासभर विहिरीत बसावे लागत आहे

केज (जि. बीड) -ऊसतोडणीसाठी साखर कारखान्यावर गेलेले आई-वडील. कोरोनाच्या संचारबंदीत अडकून पडलेल्या चौदावर्षीय शाळकरी चिमुकलीचा गावी दोन भावंडांना सांभाळण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष मन हेलावून टाकणारा आहे. लहान वयात संसार करणाऱ्या महिलांनाही नवल वाटावे असाच जीवनप्रवास सुरू आहे. 

धारूर तालुक्यातील रुईधारूर ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या पंचवीस कुटुंबांच्या लोकवस्तीत साधारणतः दोन-अडीचशे लोकसंख्या असणाऱ्या वीजहिरा लमाणतांड्यातील आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या स्नेहल संजय राठोड या चिमुकलीचा हा हृदय पिळवटून टाकणारा दैनंदिन जीवनातील जीवघेणा प्रवास. आडस-दिंद्रुड जिल्हा रस्त्यावर उजाड माळरानावर वसलेली ही लोकवस्ती आहे. कधीकाळी आकाशातून वीज कोसळून पडलेल्या खड्ड्यात पाणी आले. त्याच्याजवळच वस्ती करून वास्तव्यास राहिलेल्या बंजारा समाजाच्या या लोकवस्तीलाच पुढे वीजहिरा तांडा असे नाव पडले. मात्र मागील काही वर्षांपासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी होऊन त्या हिऱ्याचे तीन परस खोलीच्या विहिरीत रूपांतर झाले आहे.

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

रोजगाराची कुठलीही सोय नसल्याने येथील प्रत्येक कुटुंबातील कर्ती माणसे दरवर्षी दूर-दूरच्या साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी जातात. त्यानंतर येथे राहतात ती म्हातारी माणसे व शाळकरी मुले. अशाच एका ऊसतोड मजुराच्या लेकीचा संघर्षमय जीवनप्रवास सुरू आहे. आई-वडील ऊसतोडणीला गेल्यावर घरची धुणीभांडी, सडा-सारवण व स्वयंपाक करून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आडस येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आठवीच्या वर्गात स्नेहल शिक्षण घेत आहे. सध्या आलेल्या कोरोनासारख्या आपत्तीमुळे संचारबंदी लागू करण्यात आल्याने साखर कारखाना बंद होऊनही आई-वडील कोल्हापूर जिल्ह्यातील गुरुदत्त साखर कारखान्यावर अडकून पडले आहेत.

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

सध्या तांड्यावर पाणीटंचाई तीव्र झाली आहे. अशा परिस्थितीत तिला हंडाभर पाण्यासाठी तीन परस खोलीच्या विहिरीत दोरीच्या साहाय्याने उतरून वाटीने पाण्याचा हंडा भरण्यासाठी तासभर विहिरीत बसावे लागत आहे. पाण्याने हंडा दोरीच्या साहाय्याने जीव मुठीत घेऊन वर चढून यावे लागत आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात या चिमुकलीला दहावीत शिकणाऱ्या रोहित व सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या दोन भावंडांचा सांभाळ करावा लागत आहे. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

 संघर्ष हृदयस्पर्शी 
कोरोनाच्या संकटाच्या काळात या भावंडांना आई-वडिलांची आठवण येणे साहजिकच आहे. मात्र अशा परिस्थितीही आपल्या दोन भावंडांचा सांभाळ करणाऱ्या या चिमुकलीचा संघर्ष हृदयस्पर्शी असाच आहे. अशा परिस्थितीत संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या ऊसतोडणी मजुरांना शासनाने सर्व नियम पाळून आपल्या मुला-बाळांत जाण्याची सोय करण्याची आवश्यकता आहे. 

कोरोनामुळे माझे आई-वडील दूर कारखान्यावर अडकून पडले आहेत. सर्वांचे आई-वडील त्यांच्या मुलांसोबत आहेत. त्यामुळे त्यांची आठवण येऊन ते कसे असतील याची काळजी वाटतेय. सरकारनं माझ्या आई-वडिलांना आमच्या तांड्यावर आणण्याची सोय करावी.
- स्नेहल राठोड 

 

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl's struggle in Beed district