हिंगोली: पिंपळदरीच्या 'शाहरूख' साठी सरसावले मदतीचे हात !

मंगेश शेवाळकर
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

एक दिवसांत उभी राहिली साडेपाच लाखाची रक्कम, सकाळने केले होते मदतीचे आवाहन

एक दिवसांत उभी राहिली साडेपाच लाखाची रक्कम, सकाळने केले होते मदतीचे आवाहन

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्‍यातील पिंपळदरीच्या शाहरूख शेख ला आर्थिक मदत करण्यासाठी शेकडो हात सरवाले, दानशुराच्या मदतीतून एका दिवसांत साडेपाच लाख रुपयांची रक्कम उभी राहिली असून आता शाहरूखचा वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. औंढा नागनाथ तालुक्‍यातील पिंपळदरी या दुर्गम भागातील शाहरूख शेख खाजा याने नीट परिक्षेत ९५ टक्के पर्सेंटाईल स्कोअर मिळविला होता. त्याचा बदनापूर (जि. जालना) येथे वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्‍चित झाला होता. मात्र, प्रवेशासाठी लागणारी सात लाख रुपयांची रक्कम उभारायची कशी असा प्रश्‍न शेख खाजा यांच्या समोर उभा राहिला होता. यासाठी त्यांनी सव्वा लाख रुपयांमधे घरही विक्री करून टाकले.

दरम्यान, सकाळने "आर्थिक अडचणीपुढे "शाहरूख" हतबल या मथळ्याखाली शुक्रवारी (ता.४) सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. सदर वृत्तानंतर पिंपळदरी गावात सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे, निवृत्ती खिल्लारे यांनी मदतफेरी काढून मदत गोळा केली. तर 'सकाळ'ने प्रसिध्द केलेले वृत्त सोशल मिडियावर टाकण्यात आले. त्यानंतर मदतीचा ओघच सुरु झाला. शेख खाजा यांच्यासह शाहरूखकडे मदतीबाबत विचारणा होऊ लागली अन् मदतीचा ओघही सुरु झाला. संपूर्ण हिंगोली जिल्हयातील दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने मदत करण्यास सुरवात केली अन् सायंकाळी उशीरापर्यंत साडेपाच लाख रुपयांची मदत गोळा झाली. यामुळे शाहरूखचा वैद्यकिय अभ्यासक्रमाचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, सकाळीच शेख खाजा, सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे, निवृत्ती खिल्लारे यांच्यासह गावकऱ्यांनी सर्व पैशाची जुळवा जुळव करून संबंधीत वैद्यकिय संस्थेच्या नावे धनाकर्ष काढून शाहरूखच्या हवाली केला. आज (शनिवार) दुपारीच तो प्रवेशासाठी रवाना झाला. पिंपळदरी सारख्या दुर्गम भागातून जिद्दीच्या जोरावर वैद्यकिय अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास रवाना होणाऱ्या शाहरूखला निरोप देण्यासाठी सारा गाव एकत्र आला होता. गावाचा "शाहरूख" आता डॉक्‍टर होणार याचा आनंद गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: hingoli news shahrukh shaikh help people