esakal | बीड जिल्ह्यात 'होम आयसोलेशन' बंद ! 
sakal

बोलून बातमी शोधा

quarantine.jpg
  • - रुग्णांवर बेफिकीरीचा ठपका 
  • - हजारापुढे घरी राहूनच झाले बरे 
  • - आयुक्तांच्या सुचनेनंतर निर्णय 

बीड जिल्ह्यात 'होम आयसोलेशन' बंद ! 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : वाढती रुग्णसंख्या आणि प्रशासनाकडे असलेली तोकडी यंत्रणा त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांना अनेक कटकटींना सामोरे जावे लागे. त्यामुळे शासनाने सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेल्या कोरोनाग्रस्तांसाठी होम आयसोलेशनचे धोरण आखले. राज्यात आणि मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांत सुरु असलेली होम आयसोलेशनची सुविधा बीड व हिंगोली जिल्ह्यात मात्र नाही. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
मधल्या काळात एक हजारांवर रुग्ण घरी राहूनच बरे झाले असले तरी आता केवळ अपवादात्मक परिस्थितीतच (अपंग, मनोरुग्ण) अशाच रुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने होम आयसोलेशनची (गृह विलगीकरण) परवानगी दिली जाते. गृह विलगीकरणातील रुग्ण बेफिकीरीने वागत असल्याचे (बाहेर फिरणे, एकच टॉयलेट वापरणे) काही प्रकरणांत प्रशासनाला आढळले. त्यामुळे अशा रुग्णांमुळे कोरोना फैलावाचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात हा निर्णय घेण्यात आला. वास्तविक मागच्या महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनीही गृह विलगीकरण बंद करा, परवानगी देऊ नका, असे निर्देश दिले होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारात फिजीशिअन व भुलतज्ज्ञांची मोठी गरज आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत वरील दोन्हीही तज्ज्ञांची संख्या अगदीच तोकडी आहे. नियमित रुग्णांची तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रीयांसह कोरोनाग्रस्तांवरील उपचार अशी दुहेरी कसरत केवळ १४ फिजीशिअन व २० भुलतज्ज्ञांच्या खांद्यावर आहे. ही संख्याही अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्हा रुग्णालय व अधिनस्थ उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांतील आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सध्या कंत्राटी तत्वावरील मनुष्यबळाच्या जोरावर यंत्रणा उभा केली असली तरी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निकृष्ट जेवण, स्वच्छता, उपचारात दिरंगाई अशी ओरड होते. त्यामुळे सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेले होम आयसोलेशनमुळे रुग्ण घरीच राहून उपचार घेतील असे धोरण राज्य सरकारने अवलंबले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही हलका झाला. तसेच रुग्णांनाही घरच्या वातावरणात राहता येईल. दरम्यान, होम आयसोलेशनची परवानगी नसल्यामुळे सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेले आर्थिक क्षमता असलेले रुग्ण आता खासगी दवाखान्यांत ॲडमिट होत आहेत. 
 

(संपादन-प्रताप अवचार)