पंकजा मुंडेंच्या बीडमधील सत्तेला असे लागले ग्रहण

दत्ता देशमुख, बीड
Monday, 6 January 2020

ताब्यात असलेल्या संस्थांतील कारभाऱ्यांचा कारभार मुळावर?
पंकजा मुंडेंची राजकीय दिशा आणि वाटचाल चुकतेय का? पराभवाची कारणे शोधून त्यावर मीमांसा करतात का? ताब्यात असलेल्या संस्थांतील कारभाऱ्यांचा कारभार मुळावर येतोय का? असे प्रश्‍न समोर येत आहेत.

बीड : विधानसभा निवडणुकीपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवाची मालिका सुरू झाली असून, जिल्हा परिषदेतही राज्यात नवीन समीकरण उदयास आल्याने पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखालील भाजपला बीड जिल्हा परिषदेतील सत्ता गमवावी लागली आहे.

आता पंकजा मुंडे पराजयाची कारणे शोधून कोणते राजकीय पाऊल टाकतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनाही स्वत:च्या पराभवासह ताब्यातील संस्थांमधील सत्तांतरे पाहावी लागली होती; परंतु राजकीय दिशा आणि पावले कायम योग्य पद्धतीने टाकण्यावर कटाक्ष असल्याने अनेक वर्षे सत्तेबाहेर राहूनही मुंडेंनी त्यांची राजकीय ताकद कायम ठेवली होती. 

आता पंकजा मुंडेंची राजकीय दिशा आणि वाटचाल चुकतेय का? पराभवाची कारणे शोधून त्यावर मीमांसा करतात का? ताब्यात असलेल्या संस्थांतील कारभाऱ्यांचा कारभार मुळावर येतोय का? असे प्रश्‍न समोर येत आहेत.

वाचा - असा मिळवला राष्ट्रवादीने विजय

2014 मध्ये मोदी लाट होतीच; शिवाय गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनाची सहानुभूतीही होती. त्यावेळी लोकसभा पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे विक्रमी मतांनी विजयी झाल्या. तर, जिल्ह्यातील सहापैकी पाच जागा भाजपने जिंकल्या.

पंकजा मुंडेंना चांगल्या खात्यासह पालकमंत्रिपदही भेटले. पुढे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही भाजपने यश मिळविले; पण पुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा जिल्ह्यात पाडाव झाला. 

त्यांच्याच मतदारसंघात भाजपची मोठी पीछेहाट झाली. अगदी पंकजा मुंडेंकडे ग्रामविकास खाते असतानाही जिल्हा परिषद ताब्यात येणार नाही, असे चित्र होते. मात्र, राजकीय डावपेच आखून त्यांनी यश मिळविले; परंतु पराभवाचे मूळ कारण त्यावेळी शोधले नाही. 

क्लिक करा - पुतळे उभारले, विचारांच्या पेरणीचे काय

नगरपालिका निवडणुकीतही हीच परिस्थिती झाली. त्यांच्याच परळीत भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला; परंतु याही पराभवाची कारणे शोधली गेली नाहीत आणि काही उपाययोजना केल्या नाहीत. 

स्पष्टवक्तेपणा, बेधडक स्वभाव, निर्णय क्षमता आणि समाजाची खंबीर साथ या पंकजा मुंडे यांच्या जमेच्या बाजू होत्या म्हणूनच लोकसभेला पुन्हा डॉ. प्रीतम मुंडेंच्या विजयाचे मताधिक्‍य पावणेदोन लाखांच्या घरात गेले. मात्र, पुढे विधानसभेला मोठा धक्का बसला. राजकारणात जय-पराजय होत असले तरी पंकजा मुंडेंनी पराभवाच्या मुळाशी जाऊन त्यावर योग्य तोडगा आणि पुढील वाटचाल ठरविल्याचे अद्याप तरी दिसत नाही.

नुकतीच जिल्हा परिषदेची सत्ता गमवावी लागली. महाविकास आघाडीचा प्रयोग हे कारण असले तरी सोबतचे सदस्य का गेले? हा प्रश्‍न आहे. मागच्या काळात सत्ता आणि मंत्रिपदामुळे अनेक गोष्टी घडविणे शक्‍य झाले. आता सत्ता गेली असली तरी वेळ गेलेली नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे.

संस्थेतील कारभाराचाही फटका

पूर्वी राज्यात सत्तेत असताना आणि स्वत: मंत्री असताना पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासासाठी संबंधित जिल्हा परिषद आणि शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी जिल्हा बॅंक भाजपच्या ताब्यात होती. जिल्हा परिषदेच्या कारभाराची सूत्रे ज्यांच्या हाती होती, त्यांनी स्वकल्याणाला अधिक भर दिल्याने असंतोष उफाळून आला. 

हेही वाचा - अमित देशमुख लावणार का सांस्कृतिक धोरण मार्गी

एखाद्या सदस्याच्या गटात निधी देताना त्याला माहीतही नसावे वा त्याच्याविरोधात काम करणाऱ्यांना निधी देण्यामागे काय 'हित' दडलेय, याकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांना बदलीच्या धमक्‍या देऊन समाजसेवकांनी फायली घरी नेण्याचा मोह शेवटपर्यंत सोडला नाही. त्याकडेही काणाडोळाच केला गेला.

त्यामुळे पंकजा मुंडेंनी कोट्यवधीचा निधी आणूनही त्यावर या कारभारामुळे पाणी फेरले गेले. जिल्हा बॅंकेतही वेगळा प्रकार घडला नाही. आता पुन्हा बॅंक बुडविण्यात अग्रेसर असणारे सक्रिय झाले आहेत. 

जिल्हा परिषदेत सोबत असलेली शिवसेना वा कॉंग्रेस जाणे हा महाविकास आघाडीचा भाग असू शकतो; परंतु भाजपच्या सदस्यांनी साथ सोडणे, हा त्यांनी बसविलेल्या कारभाऱ्यांच्या वागण्याचा फटका आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही.

साथ देण्याची हिंमत कोण करणार?

निवडणुकीत केवळ 20 सदस्य असताना भाजपने 34 पर्यंत मजल मारत झेडपीची सत्ता मिळविली. यात राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते सुरेश धस यांच्या गटाच्या पाच सदस्यांनी थेट व्हीप डावलून मदत केली. मात्र, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली. ही कारवाई भलेही नियम आणि कायद्यानुसार असली तरी त्यांना या प्रक्रियेत कोणाची साथ मिळाली, ना धीर मिळाला. 

व्वा! - झोपडीतून पुटले जिद्दीला पंख

अगदी शनिवारच्या निवडीवेळी मतदान नसल्याने त्यांना भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी साधे चहापानदेखील विचारले नाही; म्हणूनच शेवटच्या दिवसापर्यंत सोबत असलेल्या मुंदडा समर्थक शेप यांनी राष्ट्रवादीला मतदान केले. 

पराभव होणार हे दिसत असले तरी कार्यकर्त्यांना धीर देणे नेत्यांचे काम असते; परंतु पंकजा मुंडेंनी अगोदरच 'निकाल काय हे स्पष्टच' अशा आशयाची पोस्ट टाकली. त्यामुळे लढाईला उतरलेल्यांमध्ये धीर कसा राहील, असाही प्रश्न आहे.

समोर हुजरेगिरी, मागे बदनामी

पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे; परंतु त्यांच्यासमोर हुजरेगिरी आणि त्यांच्यामागे बदनामी करणाऱ्यांची संख्याही तेवढीच आहे. काही पदांवर बसविलेले आणि काही मिरवणारेदेखील या सर्व बाबींना कारणीभूत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How Pankaja Munde Lost Her Power in Beed