एसटी बसमध्ये बसा अशा नागमोडी पद्धतीने

Latur News
Latur News

लातूर : कोरोनाचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी एसटी बसमध्ये एका सीटवर एकच प्रवासी आणि तोही नागमोडी पद्धतीने बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी राज्यातील सर्व एसटी बसमध्ये सुरू झाली आहे.

मात्र, या निर्णयाला प्रवाशांच्या सहकार्याची गरज आहे, अशी अपेक्षा महामंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील बहुतांश ट्रॅव्हल्सनी आपली प्रवासी सेवा गुरूवारपासून (ता. १९) बंद केली आहे.

एका सीटवर एकच प्रवासी

बसस्थानकात बस थांबली की बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांचा घोळका दारात उभा असतो. त्यामुळे बऱ्याचदा बसमध्ये गर्दी पहायला मिळते. आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमधून प्रवास करताना दिसतात. अशा गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांनी एकमेकांत किमान अंतर ठेवणे गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर, महामंडळाने एका सीटवर एक प्रवासी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी एकामागे एक अशा पद्धतीने बसू नयेत. पहिला प्रवासी खिडकीजवळ (डावीकडे) बसला असेल तर त्याच्या मागच्या प्रवाशाने उजवीकडे बसायचे आहे. अशा नागमोडी पद्धतीची रचना एसटी बसमध्ये करण्यात आली आहे.

प्रवाशांनी सहकार्य करावे

विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रवाशांनी एकमेकांत किमान अंतर ठेवायला हवे. गर्दी टाळायला हवी. या पार्श्वभूमीवर, महामंडळाने एका सीटवर एक प्रवासी बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अंमलात आणल्या जात आहेत. यात प्रवाशांच्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे. त्यांनी सहकार्य केले तरच कोरोनाचा प्रार्दूभाव टाळता येऊ शकतो.

चालक-वाहकांना सुरक्षितता म्हणून मास्क पुरविण्याचे काम सुरू झाले आहे. जवळपास ५०० चालक आणि ५०० वाहकांना दररोज मास्क दिले जाणार आहेत. मागील वर्षीच्या तुलणेने प्रवाशांची संख्या कोरोनामुळे घटली आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या दोन आठवड्यात २४ लाखांनी उत्पन्न कमी मिळाल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.

‘बंद’मध्ये ट्रॅव्हल्सचा सहभाग

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरातील नावाजलेल्या काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपली प्रवासी सेवा बंद केली आहे. नर्मदा ट्रॅव्हल्सनी पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या मार्गावरील सेवा तात्पुरती बंद केली आहे. या मार्गावर दररोज ३६ बस धावत होत्या. विश्व ट्रॅव्हल्सनेही याच मार्गावरील बससेवा तात्पुरती बंद केली आहे. या मार्गावर दररोज जवळपास ३० बस धावत होत्या.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

राधिका ट्रॅव्हल्सनेही पुढाकार घेऊन बससेवा बंद केली आहे. यासह अन्य ट्रॅव्हल्स कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. लातूरहून पुणे आणि अन्य शहरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. बऱ्याचदा एकही प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये नसतो. त्यामुळे खासगी बस चालकांनी तिकीट दरात वाढ केली होती. या निर्णयामुळे त्यांच्यावर विविध स्तरातून टीका झाली. या पार्श्वभूमीवरही हा निर्णय घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com