सैन्यभरतीसाठी पन्नास हजार तरुण आले, बीडच्या समाजसेवकांनी नाही पाहिले! असाही ढोंगीपणा...

दत्ता देशमुख
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

बीड जिल्ह्यात सध्या सैन्य दलासाठी भरती सुरू आहे. शहरापासून दूर अंतरावर, टेकड्यांजवळ भरती असल्याने पाच जिल्ह्यातील जवळपासून पन्नास हजार तरुणांनी नोंदणी केलेली आहे. यासाठी दररोज पाच हजार तरुण भरतीसाठी येत आहेत. मात्र, या तरुणांचे निवासासह खाण्या-पिण्याचे हाल होत आहेत. तथाकथित समाजसेवकांनी भविष्यात देशाचे संरक्षण करणाऱ्या या तरुणांकडे ढुंगूनही पाहिले नाही. 

बीड -निवडणूक प्रचारात तरुणांच्या उद्धाराच्या गप्पा मारणारे, जनावरांसाठी पुळका दाखविणारे (छावण्यांसाठी), "सेवाभावी' संस्थेला शासनाचे अनुदान घेणाऱ्यांना अद्याप सैन्यात भरती होण्यासाठी आलेल्या तरुणांसाठी चहापान, थांबण्याची जागा व जेवणाची सुविधा देण्यासाठी वेळ भेटला नाही. "सकाळ'च्या वृत्तानंतर खटोड प्रतिष्ठानने गुरुवारपासून (ता. सहा) तरुणांसाठी जेवणाची व्यवस्था केली. तर रंकाळा ग्रुपने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून दिले. 

सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून शहरात दररोज पाच हजार तरुण सैन्य भरतीसाठी येत आहेत. चार फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा भरती कार्यक्रम 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा - आमदारांच्या सासऱ्याचे उपोषण अन तलाठ्यांचे निलंबन....काय आहे प्रकरण?

पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या पाच जिल्ह्यांतील 50 हजार नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी दररोज पाच हजार उमेदवारांच्या सैन्य भरतीसाठीच्या विविध चाचण्या होत आहेत. अनेक वर्षांनंतर बीडला भरती होत असल्याने तरुणांसाठी ही मोठी संधी असली तरी तरुणांची होत असलेली परवड न पाहण्याजोगी आहे. 

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

शहरापासून दूर उजाड माळरानावर ही भरती प्रक्रिया सुरू असल्याने तरुणांची खाण-पानापासून थांबण्याची मोठी परवड होत आहे. विशेष पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद व लातूर या चार बाहेर जिल्ह्यांतूनही आलेल्या तरुणांनी रात्री थांबायचे कोठे असा प्रश्न आहे. माळरानावर सर्वत्र तरुणांचे जत्थे दिसत असून, भरती होण्यापूर्वीच त्यांना डोंगरावर चढाई करावी लागत आहे. शहरापासून दूर अंतरावर भरती असल्याने जेवणाचीही परवड होत आहे. विशेष म्हणजे मध्यरात्रीच चाचण्यांना सुरवात होत आहे. 

हेही वाचा - कोरोना विषाणू लातूरमध्ये येऊच नये म्हणून....

दऱ्याखोऱ्यात वा एखाद्या मंदिरात आणि शिवारात या तरुणांना मुक्काम ठोकावा लागत आहे. दरम्यान, दुष्काळात जनावरांसाठी पुळका दाखविणारे आणि सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कागदोपत्री कार्यक्रम राबवून शासनाकडून लाखोंनी अनुदान लाटणारे; तसेच निवडणुकांत तरुणांच्या उद्धाराच्या गप्पा मारणाऱ्यांपैकी कोणीही या तरुणांसाठी कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

जनावरांचा पुळका दाखविणाऱ्यांना तरुणांची परवड दिसत नाही का, असा सवाल असला तरी जनावरांच्या छावण्या मिळाल्या की लाखोंची कमाई असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या तरुणांसाठी काही सुविधा केली तर शासन थोडेच अनुदान देणार आहे, हेच यामागचे इंगीत आहे. 

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

दरम्यान, खटोड प्रतिष्ठानने गुरुवारपासून या तरुणांसाठी जेवणाची सुविधा सुरू केली आहे. सैन्य भरतीच्या ठिकाणीच हे जेवण दिले जात आहे. ता. 14 फेब्रुवारीपर्यंत रोज जेवण देणार असल्याचे प्रतिष्ठानचे गौतम खटोड यांनी सांगितले. तर, आम्ही रंकाळा ग्रुपच्या माध्यमातून परिसरात पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून दिल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Hypocrisy Of The Beed's Social Workers