मराठा आरक्षण स्थगिती : जालना जिल्ह्यात संतप्त कार्यकर्त्यांचा उद्रेक; बसवर दगडफेक 

सुभाष बिडे 
Friday, 11 September 2020

  • बसवर दगडफेक करून काच फोडली.
  • मराठा आरक्षणांला स्थगिती मिळाल्याने नाराजीतून हे कृत्य.

घनसावंगी (जि.जालना) : मराठा आरक्षणाला न्यायालयाने अंतरीम स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे मराठा समाजात नाराजी व्यक्त केली आहे. जालन्यात या निर्णयामुळे काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. ती थेट एसटीवर दगडफेक करुन. या प्रकरणी दोन जणांविरोधात घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्हयातील घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड गावाजवळ ही घटना घडली. अंबड आगाराची बस क्रंमाक (एम.एच.२० बी एल २८७९) ही बस अंबडहून गुंज बुद्रूककडे शुक्रवारी (ता.११) दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान जात असतांना सिंदखेड जवळ बसच्या समोर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरीम स्थगिती दिल्याने नाराज झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मागणी करत बसच्या समोरील आणि मागील बाजूच्या काचा फोडल्या.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यामध्ये बसचे नुकसान झाले. बसमधील प्रवाशांना बसच्या खाली उतरवण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी ही बस घनसावंगी बसस्थानकात लावली आहे. बसचालक जे. एस. हाकणे यांनी दोन जणांनी बसवर हल्ला केल्याचे सांगीतले. या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास पोलिसांकडून केला जात आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. राज्यशासनाच्या वतीने न्‍यायालयात ज्या पद्धतीने बाजू मांडण्याची गरज होती. त्या पद्धतीने ती झाली नाही. त्यामुळे स्थगिती मिळाली आहे. परिणामी संपुर्ण समाजामध्ये पुन्हा नाराजीचा सुर निर्माण झाला आहे. येत्या काळात यावर ठोस निर्णय झाला नाही तर अशा प्रकारच्या घटनातून समाजातील उद्रेक बाहेर येण्यास विलंब लागणार नाही.  

(संपादन-प्रताप अवचार)
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna ST bus throwing Stone