महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदाचा मान लातूरला!

विकास गाढवे
Saturday, 7 November 2020

लातूरला पहिल्यांदाच मान; प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा 

लातूर : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांची मध्यवर्ती संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी येथील डॉ. उदय मोहिते यांची निवड झाली आहे. मुंबईत शुक्रवारी (ता. सहा) झालेल्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. मोहिते हे येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपअधिष्ठाता आहेत. त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या अध्यक्षपदाचा मान पहिल्यांदाच लातूरला मिळाला असून वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे लातूरचेच असल्याने संघटनेचे प्रश्न आता मार्गी लागण्याची आशाही यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
राज्यात १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून महाविद्यालयात कार्यरत सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकांची ही वैद्यकीय शिक्षक संघटना आहे. प्रत्येक महाविद्यालयात संघटनेची शाखा असून शाखेचे अध्यक्ष हे राज्य संघटनेचे सदस्य असतात. त्यांच्यातून प्रदेश पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. शुक्रवारी अध्यक्षपदासाठी डॉ. मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. डॉ. मोहिते हे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विद्यान संस्थेत उपअधिष्ठाता तसेच नेत्र शल्यचिकित्सा विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व अकॅडेमिक कौन्सिलचे सदस्यही असून सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापकांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. निवडीनिमित्त डॉ. मोहिते यांचा शनिवारी (ता. सात) संस्थेत संघटनेच्या स्थानिक शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. अधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, डॉ. गिरीश ठाकूर, मावळते अध्यक्ष डॉ. एकनाथ पवार, सचिव डॉ. समीर गोलावार, डॉ. उमेश कानडे, उपाध्यक्ष डॉ. सुषमा जाधव, सचिव डॉ. गणेश पवार, डॉ. मंगेश सेलुकर, डॉ. उमेश लाड व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा व्यक्त केली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे भत्ते, कालबद्ध वेतनश्रेणी व पदोन्नती, जोखीम भत्ता, सहायक प्राध्यापकांचे शासन सेवेत समायोजन, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या धर्तीवर वेतनवाढ, विभागीय पदोन्नती तसेच निवड मंडळामार्फत होणाऱ्या निवडीसाठी शिक्षकांना प्राधान्य आदी प्रश्न सोडविण्याला माझे पहिले प्राधान्य असणार आहे. 
- डॉ. उदय मोहिते, अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटना. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur honored as President of Maharashtra State Medical Teachers Association