लातूरकरांनो घाबरु नका ! आता कोविड सेंटरमध्येही ३३ टक्के 'ऑक्सिजन बेड' 

कोविड ऑक्सीजन.jpg
कोविड ऑक्सीजन.jpg

लातूर : जिल्ह्यात तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण २५ ते ३० टक्के असले, तरी लक्षणे असलेल्या व गंभीर रुग्णांना कोरोनाच्या तावडीतून बाहेर काढण्याला प्रशासन प्राधान्य देत आहे. यामुळेच कोविड केअर सेंटरमधील सुविधा आणखी मजबूत करण्यात येत असून, सेंटरमधील ३३ टक्के बेड ऑक्सिजनयुक्त करण्यात येणार आहेत.

त्यासाठी सेंटरमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ऑक्टोबरअखेरपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी (ता.२३) पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जिल्ह्यातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरचा उपयोग सध्या लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणांच्या रुग्णांसाठी सुरू आहे. या सेंटरमध्ये आता लक्षणे असलेल्या रुग्णांवरही उपचाराच्या सुविधा करण्यात येणार आहेत. त्यासाठी सेंटरमधील ३३ टक्के बेड ऑक्सिजनयुक्त करण्यात येणार असून, सेंटरमध्ये सेंट्रल ऑक्सिजन यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. गृहविलगीकरणालाही प्राधान्य देण्यात येत असून वीस टक्के रुग्ण या सुविधेतून कोरोनाशी यशस्वी लढा देत आहेत. रुग्णांचे समुपदेशनाचे काम अखंडितपणे सुरू असून, त्यासाठी समुपदेशकांची संख्याही वाढवली आहे.

शहरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत असून लिक्विड ऑक्सिजनसाठी जिल्ह्याला पुण्यावर अवलंबून राहावे लागते. या ऑक्सिजनचा पुरवठाही सध्या सुरळीत असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधाचे (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) प्रमाण १८ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.१७ टक्के आहे. सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानात आतापर्यंत पन्नास हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, यात आढळलेल्या ऐंशी संशयित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे उपस्थित होते. 

ऑक्सिजन निर्मितीत वाढ 
जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील प्रकल्पाची ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्यात आली आहे. पूर्वी प्रकल्पातून दररोज सहा किलोलिटर ऑक्सिजन निर्मिती करण्यात येत होती. काही दिवसांत ती वीस किलोलिटर होईल. उदगीर व निलंगा येथेही ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. शहरातील खासगी एजन्सींनी त्यांच्या उत्पादनात वाढ केली असून सध्या या एजन्सीकडून ३१७० किलोलिटर, तर तेरा किलोलिटर लिक्विड ऑक्सिजन निर्मिती केली जात असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णालयांतून ऑक्सिजनचा अनावश्यक वापर होणार नाही, यावर नियंत्रण ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com