बिबट्या पुन्हा आला... आता खंडोबाच्या साताऱ्यात

संकेत कुलकर्णी
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

कालवडीच्या पाठीवरील आणि नरडीवरील मोठ्या जखमा, दातांचे व्रण बिबट्याचेच असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या भागात तरसांनी सामुहिक हल्ला करण्याची शक्यता काहींनी वर्तवली असली, तरी....

औरंगाबाद : सिडकोतील बिबट्याची चर्चा आणि किस्से अद्याप संपत नाहीत, तोच आता सातारा गावाच्या माळावर नव्या बिबट्याचे आगमन झाल्याची चर्चा रंगली आहे. बुधवारी (ता. 11) सकाळी कडेपठारावर कालवड मृतावस्थेत सापडली असून, हे बिबट्याचेच काम असल्याचे वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

यापुढेही येतच राहणार बिबटे, शहरवासीयांनो आता सवय करून घ्या

सातारा तांड्यापुढील डोंगराळ भाग वन खात्याच्या अखत्यारीत येतो. मात्र, या भागात तरस वगैरे कधी कधी येत असले, तरी पूर्वी कधी बिबट्याचे वास्तव्य नव्हते. मंगळवारी (ता. १०) सायंकाळी तांड्यावरील गोपाळांच्या गायी परतल्या, त्यात एक कालवड मागे राहिली. रात्रीच्या अंधारात तिचा शोध घेणे शक्य नसल्याने गुराख्यांनी सकाळी माळावर शोध सुरू केला. यावेळी कडेपठाराच्या मार्गावर ती कालवड मृतावस्थेत आढळून आली. गावकऱ्यांनी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती दिली असता, त्यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. 

खोल जखमा, बिबट्याचाच अंदाज 

वन खात्याच्या अनुभवी कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता, कालवडीच्या पाठीवरील आणि नरडीवरील मोठ्या जखमा, दातांचे व्रण बिबट्याचेच असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या भागात तरसांनी सामुहिक हल्ला करण्याची शक्यता काहींनी वर्तवली असली, तरी जखमांचे व्रण पाहता हा हल्ला मोठ्या जनावरानेच केल्याचा वनपालांचा कयास असल्याचे गुराख्यांनी सांगितले. मात्र, याबद्दल वन परिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद होता. 

कसा पकडला होता सिडकोतून बिबट्या, पहा व्हिडिओ

आज करणार कसून पाहणी

या भागात पूर्वी बिबट्याचे वास्तव्य आढळले नसले, तरी तो इथे आल्याची शक्यता नाकारता येत नाही. तो प्रत्यक्ष कुणाला दिसला नसल्याने, त्याच्या पावलांचे ठसे, मार्ग याचा शोध घेऊन नक्की निष्कर्ष काढता येईल, असे वनपाल एस. बी. चव्हाण आणि वनरक्षक हरिसिंग घुसिंगे यांनी सांगितले. या भागात गुरुवारी (ता. १२) सकाळी वन विभागाचे पथक बारकाईने पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, बिबट्या असलाच, तरी तो वनक्षेत्राच्या बाहेर आलेला नाही. तसेच त्याच रात्रीतून तो निघून गेल्याचीही शक्यता असू शकते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही त्यांनी म्हटले.

या बिबट्याने केला दोनदा गृहप्रवेश

बिबट्याने सौजन्य दाखवले म्हणून निभावले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Again in Aurangabad, Satara Village on High Alert