मनसेचा उमरग्यात कर्जमाफीसाठी महामोर्चा; बॅंकांच्या सक्तीमुळे महिला संतापल्या

000MANSE AANDOLAN.jpg
000MANSE AANDOLAN.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : तालूक्यातील महिला बचत गट, बँका, फायनान्सचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी (ता.२१) तहसील कार्यालयावर भव्य महामोर्चा काढला. दरम्यान कोरोनाच्या काळात सर्व उद्योग, व्यवसाय बंद झाल्याने हाताला काम नसल्याने आर्थिक संकटात असताना बँका, फायनान्सकडून सुरू असलेल्या सक्तीच्या वसुलीमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या महिलांना न्याय देण्यासाठी मनसेने पहिल्यांदाच मोठे आंदोलन केले.


बुधवारी दुपारी साडेबारा वाजता दत्त मंदिरापासुन सहकार सेनेचे राज्यध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळूंके यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाला सुरुवात झाली. तालुक्यातील महिला बचत गट व उमेदच्या हजारो महिला यात सहभागी झाल्या होत्या. बँका, फायनान्स यांच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो महिलांनी आपल्या छोट्या, मोठ्या व्यवसायासाठी कर्ज स्वरुपात कर्ज घेतले होते. परंतु कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनमध्ये कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. व्यवसाय बंद पडल्याने शासनाने कोरोनाच्या काळातील कर्जाच्या हप्त्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली होती, परंतु मुदतवाढ संपताच बचत गट, फायनान्स व बँका व्याजावरती व्याज लावून वसुलीसाठी तगादा लावत आहेत.

शासनाने महिलांची अडचणी लक्षात घेऊन सर्वच महिला बचत गट, बँका व फायनान्सचे संपूर्ण कर्ज माफ करावे किंवा मागील सहा महिन्याचे हप्ते व व्याज माफ करावे व कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पुढील तीन महिन्याची मुदत वाढ करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दरम्यान या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री. नवगिरे, उपाध्यक्ष श्री. साळूंके, तालुकाध्यक्ष हरिभाऊ जाधव यांनी यापुढे बँका व फायनान्सवाल्यांनी महिलांना कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लाऊ नये, अन्यथा आमची तुमच्याशी गाठ आहे असा इशारा दिला. या वेळी सहकार सेनेचे दिलीप धोत्रे, ज्योतीबा येडगे, हेमंत बनसोडे, विठ्ठल घोगरे, जय घोगरे, किरण कांबळे, विश्वनाथ स्वामी, लक्ष्मण सास्तूरे, विजय गायकवाड, पृथ्वीराज जाधव, दगडू आगलावे, आकाश कांबळे, अभिषेक भालेराव, अभिजित शिंदे, अर्जुन चव्हाण यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

" कोरोनाच्या काळात काम नसल्याने पोटाला खायला मिळाले नाही. अशा कठीण स्थितीत बँका, फायनान्सकडून सक्तीच्या वसुली सुरू झाली. महिलांना दमदाटीचा प्रयत्न झाला. रणरागिनींनी बरेच सहन केले आता रुद्रावतार घेण्याची वेळ आली आहे. शासन, प्रशासनाने आर्थिक अडचणीत असलेल्या बचत गट व महिलांचे कर्ज माफ करून दिलासा देण्याची गरज आहे. -सत्यवती इंगळे, नाईचाकूर
 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com