सगळीकडे ओव्हरफ्लो ; 'मांजरा' ने मात्र आत्ताशी गाठली पन्नाशी ! 

हरी तुगावकर
Friday, 25 September 2020

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील बहुतांश धरणे सततच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाली आहेत. मात्र लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि लातूर सह अन्य दोन जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेले मांजरा धरण नुकतेच पन्नास टक्के भरले आहे. आता ११२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा धरणात झाला आहे. 

लातूर : लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मांजरा धरण पावसाळा संपत आलेला असताना शुक्रवारी (ता. २५) पन्नास टक्के भरले आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या धरणात ११२ दशलक्षघनमीटर एकूण पाणीसाठा झाला असून ता. एक जूनपासून ते शुक्रवारपर्यंत (ता. २५) धरणात १०५.४४ दशलक्षघनमीटर पाण्याची आवक झाली आहे. गेल्या काही दिवसापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरण पन्नास टक्के भरल्याने लातूर शहराचा काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मराठवाड्यातील इतर सर्व धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. मांजरा धरण मात्र आता पन्नास टक्के भरले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठवाड्यातील सर्व लहान मोठे धरणे भरून ओव्हरफ्लो होत आहेत. पण लातूरची परिस्थिती मात्र या पेक्षा वेगळी आहे. जिल्ह्यात मोठे पाऊस न झाल्याने मध्यम तसेच लघु प्रकल्पातही अद्यापपर्यंत समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. काही प्रकल्प तर अद्यापही कोरड्या अवस्थेत आहेत.  त्यात लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यासाठी धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरण महत्वाचे आहे. या धरणात गेल्या वर्षी पाणीच आले नव्हते. त्यामुळे लातूरला वर्षभर मृतसाठ्यातून पाणीपुरवठा केला गेला.

दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत होता. यावर्षी देखील धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरवातीला पाऊस झाला नाही. त्यानंतर या पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरुपाचे पाऊस होत गेल.त्यात सातत्यही राहिले. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली. त्यात गेल्या काही दिवसात तर पाणलोट क्षेत्रात पावसाची दररोज हजेरी आहे. त्यामुळे धऱणातील पाण्यासाठ्यात दिवसाला दोन तीन दशलक्षघनमीटरने वाढ होत आहे. लातूरकरांसाठी ही समाधानाची बाब असून एक ते दीड वर्ष पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आकडेवारी

  • प्रकल्पीय पाणीसाठा--२२४.०९ दशलक्षघनमीटर
  • उपयुक्त पाणीसाठा--१७६.९६ दशलक्षघनमीटर
  • मृत पाणीसाठा--४७.१३ दशलक्षघनमीटर
  • पूर्ण संचय पातळी--६४२.३७ मीटर
  • सध्याचा एकूण पाणीसाठा--११२.०८ दशलक्षघनमीटर
  • सध्याचा उपयुक्त पाणीसाठा--६४.९५ दशलक्षघनमीटर
  • एकूण पाणीसाठ्याची टक्केवारी ---५०.०१
  • उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी--३६.७०
  • ता. एक जूनपासूनची धरणातील आवक--१०५.४४ दशलक्षघनमीटर

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manjara dam 50 percent full Latur News