औरंगाबादेत "म्हाडा' बांधणार साडेचार हजार घरे

प्रकाश बनकर
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

जनसामान्यांना रास्त दरात दर्जेदार घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा काम करते. नक्षत्रवाडी येथे 15 हेक्‍टर जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात तीन हजार सदनिकांची योजना प्रस्तावित असून डीपीआर मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. 

औरंगाबाद​: सर्वसामान्यांना स्वप्नातील घर देण्यासाठी कार्यरत असलेल्या "म्हाडा'तर्फे शहरात ब्रिजवाडी, नक्षत्रवाडी आणि पडेगाव येथे 4 हजार 564 घरांचे प्रकल्प सुरू होणार आहेत. या प्रकल्पांपैकी ब्रिजवाडीच्या आठ हेक्‍टरच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. नक्षत्रवाडी येथील 15 हेक्‍टरचा प्रकल्प मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती म्हाडाचे सभापती संजय केणेकर यांनी "सकाळ'ला दिली. 

जनसामान्यांना रास्त दरात दर्जेदार घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा काम करते. नक्षत्रवाडी येथे 15 हेक्‍टर जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात तीन हजार सदनिकांची योजना प्रस्तावित असून डीपीआर मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तर ब्रिजवाडी येथे आठ हेक्‍टर शासकीय जमिनीलाही मंजुरी मिळाली आहे. येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दीड हजार सदनिकांचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासह पडेगाव येथील 364 सदनिकांसाठी टेंडर काढण्यात आले आहेत.

हेही वाचा: पाण्यावर पेटला दिवा अन्‌ बाटलीतून दूध झाले गायब!

इतर जिल्ह्यांतही प्रकल्प 
जालना येथील गट क्रमांक 488 वरील शिल्लक क्षेत्रावर घरकुलाची योजना असून 280 सदनिका असणार आहेत. हिंगोली येथे 180 घरांच्या प्रकल्पाची बांधकामाची निविदा अंतिम टप्प्यात आहे. यासह पुढील वर्षभरात चिकलठाणा, वळदगाव, देवळाई, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, लातूर, तुळजापूर, माहूर आदी ठिकाणी मिळून विविध घटकांसाठी 15 हजार घरे उभारण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे, असेही श्री. केणेकर यांनी सांगितले. 
जाणून घ्या - मेंदू न उघडता ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया

देवळाईकरांना मिळणार पाणी 
म्हाडातर्फे सातारा, देवळाई आणि तीसगाव येथील सदनिकांची किंमत 30 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी करून ड्रॉ पद्धतीने विक्री करण्यात आली. यात देवळाईच्या सदनिकांसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. यातील 1 कोटी 75 लाख रुपये एमआयडीसीला देण्यात आले आहेत. याचे टेंडर काढले आहे. याचे काम लवकरच सुरू होणार आहे. 

महापौर म्हणाले जोडा, महावितरणने केले तोडा​

मराठवाड्यात होणार 25 हजार सदनिका 

मराठवाड्यात म्हाडातर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यात औरंगाबाद, जालना, हिंगोली, अंबाजोगाई, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांत म्हाडातर्फे विविध प्रकल्प सुरू आहेत. येत्या पाच वर्षांत यासह संपूर्ण मराठवाड्यात 25 हजार सदनिका तयार होणार आहेत. याचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती म्हाडाचे विभागीय सभापती संजय केणेकर यांनी दिली. 

मराठवाड्यात सुरू असलेले प्रकल्प 

औरंगाबाद- 4564 
जालना- 280 
हिंगोली- 132 
अंबाजोगाई- 400 
उस्मानाबाद- 150 
लातूर- 400 
एकूण--- 5,926 सदनिका 

 

औरंगाबादेत तीस वर्षांत 16 हजार 805 सदनिका उभारल्या. 3 हजार 313 भूखंड विकसित केले असून प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे-2022 अंतर्गत औरंगाबादेत म्हाडातर्फे नक्षत्रवाडी, जालना तसेच लातूर येथील एकूण 648 सदनिकांचे काम प्रगतिपथावर आहे. महापालिका व नगरपालिकेतर्फे विभागात 61 हजार 157 घरकुले मंजूर असून 2 हजार 281 घरकुले प्रगतिपथावर आहेत. म्हाडाच्या जागेवर झालेली अतिक्रमणे हटविली. गेल्या अडीच महिन्यांत म्हाडाला 40 कोटी रुपयांनी नफ्यात आणले. 
- संजय केणेकर, सभापती, म्हाडा 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mhada 'to construct' four and a half thousand houses in Aurangabad