
बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून झाला गौरव
लातूर : चित्रपट सृष्टीतील दिग्गज असलेले अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसून आपल्या गुणवत्तेची चुनूक दाखवत येथील अस्मिता गोरे या विद्यार्थीनीने कौन बनेगा करोडपती शोमध्ये साडे बारा लाख रुपये जिंकले. येथील बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱया अस्मिताचे वडिल अंध असून आई एका डोळ्याने अंध आहे. घराची जबाबदारी अंगावर घेत अस्मिताने हे यश मिळवले आहे. या यशाबद्दल तीचा महाविद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
येथील बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थीनी अस्मिता माधव गोरे हीने गुरुवारी (ता. सात) झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्येही सहभाग घेतला. चित्रपट सृष्टीतील दिग्गज अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नाला तीने आत्मविश्वासाने उत्तरे दिली. या शोमध्ये तीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर साडे बारा लाख रुपये जिंकले. अस्मिताचे वडील अंध असून आईही एका डोळ्याने अंध आहे. वयाच्या केवळ 22 वर्षी आपल्या कुटूंबाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर पेलणार्या अस्मिताचे कौतूक होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या यशाबद्ल बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात तीचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रेरणा आणि प्रोत्साहन हे सक्षम यशाचे दोन पैलू असतात. त्याच्याच जीवावर माणूस आपल्या जीवनात हवी ती ध्यैय आणि उद्दीष्टे साध्य करु शकतो. याचा साक्षात्कार ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये झेंडा रोवणारी विद्यार्थीनी अस्मिता गोरे हिने करुन दाखविला आहे, असे मत बिडवे यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे संचालक मन्मथअप्पा येरटे, प्राचार्य नरेंद्र खडोट, प्रा. धर्मराज बिरादार, प्रा. श्रीकांत तांदळे उपस्थित होते.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अभियांत्रिकीनंतर अस्मिताला एमपीएससी, युपीएससीच्या परिक्षा देऊन प्रशासकिय सेवेतील मोठे अधिकारी व्हायचे आहे. तीचे स्वप्न साकार करण्यासाठी बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बिडवे यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तीला स्पर्धा परीक्षांच्या काही निवडक व दर्जेदार पुस्तकांचा संचही भेट देण्यात आला.
(संपादन-प्रताप अवचार)