शेतकरी बरबाद झाला, साहेब मदत करा हो !

तानाजी जाधवर
Saturday, 19 September 2020

उस्मानाबाद मतदार संघाचे सत्तापक्षातील शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी जिल्ह्यातल्या नुकसानीसाठी त्वरीत मदत मिळावी अस साकडं सराकरकडे घातले आहे.  

उस्मानाबाद : जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरी बरबाद झाला आहे. तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. जिल्ह्यातली नुकसानीची पाहणी करुन सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी. अशी मागणी शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यामुळे सत्तेतील आमदाराने आपल्याच मंत्र्याला केलेल्या या मागणीचा लाभ येथील शेतकर्यांना त्वरीत मिळणार का असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

आमदार घाडगे पाटील यांनी पत्रात म्हटले की, जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने पावसाचे पाणी सोयाबीन पिकात साचून काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. यंदा हंगामाच्या सूरुवातीलाच बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. त्यावेळी आपण स्वतः येऊन पाहणी केली होती. आताच्या स्थितीला सोयाबीन काढण्याच्या अवस्थेत होते. पिक अत्यंत चांगल्या पध्दतीने आले असताना निर्सगाची अवकृपा झाली आहे. सतत होत असलेल्या पावसाने सोयाबीनच्या पिकात पाणी साचले आहे. शेंगा पाण्यात राहत असल्याने त्या खराब झाल्या असल्याचे घाडगे पाटील म्हणाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गेल्या काही वर्षात सोयाबीन हे जिल्ह्यातील मुख्य पीक बनले असुन अशा स्थितीमध्ये त्याच पिकाच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असल्याची भिती आमदार पाटील यांनी व्यक्त केली. सोयाबीन शेगांना कोंब फुटत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच हा पाऊस थांबणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अजुनही पुढे हे नुकसान वाढणार असल्याचे चित्र आहे. नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची विनंती आमदार पाटील यांनी कृषीमंत्री यांना केली आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कृषी विभाग, महसूल विभाग व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याकडून संयुक्तपणे पंचनामा करण्याचे आदेश देऊन  झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना द्यावी. दुबार पेरणीने अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हाता तोंडाशी आलेल पिक जात असल्याने अडचणीत अधिक भर पडल्याचेही त्यानी सांगितले आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची अपेक्षा सरकारकडून व्यक्त होत आहे. या मागणीची दखल घेऊन आपण लवकरात लवकर आदेश काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार घाडगे पाटील यांनी केली आहे.   

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Kailas Ghadge Patil State government Demand help farmers