esakal | ऊसतोड मजुरांना अडविल्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

धस.jpg

मिरजगाव येथे अडविली मजुरांची वाहने

ऊसतोड मजुरांना अडविल्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांना अटक

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (बीड) : ऊसतोड मजुरांची वाहने अडविल्याप्रकरणी विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांना आज (ता.१६) दुपारी अटक करण्यात आली. आष्टी-कर्जत (जि.नगर) हद्दीवरील मिरजगाव (ता. कर्जत) येथे धस समर्थकांनी मजुरांची साखर कारखान्यांवर निघालेली वाहने अडवून आष्टीला आणली. या प्रकरणी आष्टी पोलिसांत दाखल गुन्ह्यात आमदार धस यांना अटक करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्यात सध्या ऊसतोड मजुरांच्या विविध मागण्या पुढे येत आहेत. याच कारणावरून धस समर्थकांनी मिरजगावहून पुढे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे जाणारी वाहने अडविली. या वाहनांमध्ये सुमारे अडीचशे मजूर होते. सर्व मजुरांना पुढे जाण्यास मज्जाव करून ही वाहने व मजूर धस समर्थकांनी आष्टी येथे दूध संघासमोरील मोकळ्या जागेत आणून उभी केली. तेथे आमदार धस यांनी मजुरांची भेट घेऊन भाववाढ झाल्याशिवाय कारखान्यांकडे जाऊ नका. आता तुम्ही घराकडे रवाना व्हा, असे सर्वांना सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, यावेळी तेथे पोलिसांनी ‘मजुरांना अडवू नका, तुमच्यावर गुन्हा दाखल करू’, असे आमदार धस यांना सांगितले. परंतु धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. मजुरांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय एकही मजूर कारखान्याकडे जाऊ देणार नसल्याचे त्यांनी ठामपणे पोलिसांना सांगितले. त्यानंतर आष्टी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी रियाज कलीम पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदार धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

जामिनावर मुक्तता
पोलिस कर्मचार्‍याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार धस स्वतःहून पोलिस ठाण्यात  हजर झाले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया होऊन आमदार धस यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मजुरांना चहा-नाष्टा व जेवण
वाहने अडविलेले मजूर हे धुळे व नंदूरबार जिल्ह्यातून दूरचा प्रवास करून आलेले होते. सकाळच्या वेळी मजुरांची वाहने अडवून आष्टीत आणल्यानंतर आमदार धस यांच्या सूचनेप्रमाणे सर्व मजुरांची चहा-नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच दुपारपर्यंत मजूर येथेच असल्याने दुपारचे जेवणही सर्वांना यथेच्छपणे देण्यात आले. मजुरांची कोणतीही आबाळ होऊ नये, याची चोख दक्षता घेण्यात आली.

ऊसतोड मजुरांच्या न्याय्य मागण्यांसाठी आमचे आंदोलन सुरू आहे.  लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघटनेतेली तालुकाध्यक्ष व इतरांनी ऊसतोड मजुरांच्या गाड्या अडविल्या होत्या. मीही तेथे गेलो. यावेळी कुत्रे-मांजरे भरतात त्या पद्धतीने दोन-तीन वाहनांमध्ये दोनशे-अडीचशे लोक भरून कारखानदार घेऊन जात होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर हे योग्य आहे का, असा सवाल करीत आमचा संप मोडण्याचे हे षड्यंत्र असून, शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरणार नाही.
 - आमदार सुरेश धस

(संपादन-प्रताप अवचार)