बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या मेहुण्याचा बीडमध्ये खून, एकास जन्मठेप व दंड 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड - बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्यास जन्मठेप व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. टी. पोळ यांनी बुधवारी (ता. 22) हा निकाल दिला. 

शेख अमजद शेख अहमद ऊर्फ बाबू असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने जलील ऊर्फ जल्लू नसीर अहमद (30, रा. गांधीनगर, बीड) याचा खून केला होता. जलील ऊर्फ जल्लू नसीर अहमद (वय 30, रा. गांधीनगर, बीड) याला तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्ये आहेत. जलील याचे कॅरमचे दुकान होते. मात्र, लग्नास सहा वर्षे उलटल्यानंतर त्याने पत्नी दिलशाद बेगमच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरवात केली. 

26 मार्च 2017 ला दुपारी पत्नीसोबत वाद सुरू झाला. यावेळी त्याचा मेहुणा शेख अमजद शेख अहेमद ऊर्फ बाबू, सासू शेख शफिया शेख अहमद ऊर्फ बाबू हेही होते. दांपत्यातील शाब्दिक वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नी दिलशाद बेगम व सासू शेख शफिया यांनी जलील यास शिवीगाळ करून ठार मारण्याच्या धमक्‍या दिल्या. त्या दोघी एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी त्याचे हात घट्ट पकडून ठेवले. एवढ्यात त्याचा मेहुणा शेख अमजद शेख बाबू ऊर्फ अहमद याने त्याच्या कमरेला असलेल्या खंजीरने जलीलच्या छातीत वार केला. 

झटापटीत तो जवळच्या नालीत कोसळला. यावेळी आवाज ऐकून जवळच असलेला त्याचा भाऊ फईम ऊर्फ पमू हा धावत आला. त्याने सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याही छातीत खंजीरने वार केला. जलीलचे बंधू सय्यद अखिल अहमद सय्यद नसीर अहमद हे तेथून जात होते. त्यांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिन्ही मारेकरी पळून गेले. गल्लीतील लोकांच्या मदतीने सय्यद अखिल यांनी जलीलला नालीतून बाहेर काढले व तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, घाव वर्मी बसल्याने जलील ऊर्फ जल्लूचा रुग्णालयात पोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. 

याप्रकरणी सय्यद अखिल यांच्या फिर्यादीवरून शेख अमजद शेख अहमद ऊर्फ बाबू, दिलशाद बेगम सय्यद जलील, शेख शफिया शेख अहमद ऊर्फ बाबू (सर्व रा. अचानकनगर, पेठबीड) यांच्यावर पेठबीड पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तत्कालीन सहायक निरीक्षक बी. डी. पावरा यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश (दोन) यू. टी. पोळ यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. 

सरकारी पक्षाचा युक्तिवाद तसेच साक्षी-पुरावे ग्राह्य धरून आरोपी शेख अमजद शेख अहमद ऊर्फ बाबू यास न्यायालयाने दोषी ठरविले. त्यास जन्मठेप व दीड हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली, तर शेख शफिया व दिलशाद बेगम या मायलेकींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. सहायक पक्षातर्फे ऍड. अनिल तिडके यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार शिवाजी डोंगरे यांनी काम पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com