पैठणचे नाथमंदिर खुले, भाविकांनी साजरा केला आनंदोत्सव 

चंद्रकांत तारु 
Monday, 16 November 2020

ऐन दिवाळीच्या शुभमुहुर्तावर पैठण येथील नाथमंदिर खुले करण्यात आले आहे. भाविकांसाठी ही दिवाळीची पर्वणीच ठरली आहे, असे मत कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केले. ते नाथमंदिर संस्थानचे अध्यक्ष देखील आहेत. 

पैठण : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी 15 मार्चपासून बंद करण्यात आलेले पैठण येथील शांतिब्रम्ह संत श्री. एकनाथ महाराज यांचे गोदाकाठावरील समाधी मंदिर व गावातील राहतावाडा असलेले नाथमंदिर आज दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, मंदिराचे द्वार खुले झाल्यामुळे भाविकांची दिवाळी अधिकच गोड झाली असल्याची प्रतिक्रिया नाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शासनाकडुन देण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करावे. असे आवाहन ही त्यांनी केले. गेल्या आठ महिन्यानंतर नाथमंदिर उघडण्यात आल्यामुळे नाथनगरीत आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच पैठण या धार्मिक नगरीतील अन्य मंदिरे ही उघडण्यात आली असुन त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय पातळीवर जैन धर्मियांचे असणारे अतिशय 1008 मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर, चक्रधर स्वामी मंदिर, पुरातन शनी मंदिर, नृसिंह मंदिर, नागघाट येथील इंद्रेश्वर मंदिर, गंगामाता मंदिर व  मुस्लिम बांधवांचे मौलाना साहब दर्गा, तसेच विविध देवदेवतांची मंदिरे ही उघडण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

माऊलीचे जन्मस्थळांचे मंदिर ही उघडले!
दरम्यान, पैठण शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेले श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांचे आपेगाव येथे गोदाकाठी असलेले मंदिर उघडले आहे. आपेगाव हे गाव संत ज्ञानेश्वर माऊलींचे जन्मगाव आहे. येथे ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर यांनी  संत ज्ञानेश्वर महाराजांचे हेमाडपंथी भव्यदिव्य मंदिरांची उभारणी केली आहे.  मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांनी मास्क व सोशल डिस्टस्निंग या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मंदिरात एकदम गर्दी होवु नये याबाबत काळजी घेतली जाईल. दर्शन कालावधीत स्वच्छता व निर्जंतुकीरण करण्यात येईल अशी माहिती मंदिर प्रमुख ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर यांनी दिली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nath Mandir open devotees celebrated Anandotsav Paithan news