
दुधना नदीच्या काठावरील घोटण (ता.बदनापुर) येथील तीन मुळे गाव शिवारातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. यामध्ये एकाचा शेततळ्यात बुडुन दुर्दैवी अंत झाला असून महिलेमुळे दोघांचा प्राण वाचला आहे.
अंबड (जि.जालना) : दुधना नदीच्या काठावरील घोटण (ता.बदनापुर) येथील तीन मुळे गाव शिवारातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. यामध्ये एकाचा शेततळ्यात बुडुन दुर्दैवी अंत झाला असून महिलेमुळे दोघांचा प्राण वाचला आहे. याबाबत माहिती अशी की, घोटण येथील गट क्रमांक ६० मधील शेतशिवारातील शेतात सोमवारी (ता.२१) दुपारी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान दहा ते पंधरा वयोगटातील तीन मित्र शेळ्या चारण्यासाठी गेले होते. बाजूलाच असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी उड्या मारल्या. मात्र यातील तिघांनाही पोहता येत नव्हते.
पाण्यात बुडत असताना त्यांनी जोराची किंकाळी ठोकल्याने जवळच्या शेतात कापूस वेचत असलेल्या सोनाली माने ही महिला शेततळ्याकडे तात्काळ धाव घेतली. महिलेकडे कापुस वेचणीसाठी असलेल्या जुन्या साडीचा उपयोग करत शेततळ्यात सोडली. यामुळे शेततळ्यात बुडत असलेल्या तिघांपैकी दोघांना साडीच्या मदतीने शेततळ्यातून बाहेर काढण्यास महिला यशवी झाली.
पण यातील अकरा वर्षीय दत्ता उर्फ सोनू बालाजी माने याचा शेतळ्यातील पाण्यात बुडुन दुर्दैवी अंत झाला आहे. यातील सचिन माने (वय १२) व शहादेव माने (वय १३) यांचे प्राण वाचविण्यासाठी सोनाली माने यांना जितेंद्र जगताप, भारत माने, उद्धव पानसरे, ऋषीकेश जगताप मदतीमुळे दोन मुलांचे प्राण वाचले आहे. घोटण येथे सोमवारी घडलेल्या दुदैवी घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संपादन - गणेश पिटेकर