लॅबची संख्या वाढवली म्हणजे कोरोना कमी होणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे

सयाजी शेळके 
Thursday, 23 July 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपपरिसरामध्ये दानशूर संस्थांच्या अर्थिक मदतीतून उभारण्यात आलेल्या कोव्हीड-१९ तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या हस्ते झाले.

उस्मानाबाद : कोरोनासोबत जगावे कसे? याची माहिती सामान्य जनतेला द्या. यातूनच आपण या महामारीच्या संकटावर मात करू. केवळ लॅबची संख्या वाढवली म्हणजे कोरोना कमी होईल, असे नव्हे. तर त्यासाठी प्रत्येकाला सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळायला लावणे, हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपपरिसरामध्ये दानशूर संस्थांच्या अर्थिक मदतीतून उभारण्यात आलेल्या कोव्हीड-१९ तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे, आ. ज्ञानराज चौगुले, आ. कैलास घाटगे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदी यावेळी उपस्थित होते.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसरात नव्याने कोव्हीड-१९ तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी जिल्ह्यातील अनेकांनी मदत केली आहे. या उपक्रमाचे कौतुक करीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रयोगशाळेचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात तपासणी प्रयोगशाळा निर्माण झाल्या आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी या प्रयोगशाळांची गरज आहे. पण, कोरोनासोबत कसे जगावे, याचे शिक्षण सामान्य जनतेला देणे आपले काम आहे. यावर जर आपण यशस्वी झालो तर नक्कीच कोरोना हारेल. काही ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवितो. मात्र नंतर अचानक दुसरी लाट येते. अन संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. असे प्रकार होत आहेत. त्यासाठी गाफील राहून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान
कोवीडची लॅब सुरू करण्यास उशीर झाला असला तरी यापुढे जिल्ह्यातील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास याचा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला. पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांनी प्रास्ताविक केले.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   
मृत्यूदर कमी करा
सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर जास्त आहे. राज्याच्या मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे. हा दर कमी करण्यासाठी योग्य ती काळजी घ्या. लॅबमध्ये योग्य प्रकारे काम करणारे कर्मचारी नेमा असा सल्ला यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

लॉकडाऊनची उघड-झाप परवडणारी नाही
सध्या काही ठिकाणी कोरोनाची संख्या वाढत असल्यानो लॉकडाऊनचा उपयोग केला जातो. मात्र सातत्याने लॉकडाऊन करणे परवडणारे नाही. त्यासाठी कोरोनासोबत कसे जगावे, हे प्रत्येकाने शिकले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग हे मोठे साधन काटेकोरपणे वापरले पाहिजे. दरम्यान उस्मानाबाद येथील कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग पाळले नसल्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख करीत अशा बाबींकडे दुर्लक्ष करू नका, असा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online inauguration Covid testing lab in Osamanabad