‘वंदे मातरम्, भारत माता की जय’च्या घोषणा देत साश्रू नयनांनी ग्रामस्थांनी दिला जवानाला निरोप

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

फुलांना सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मार्गावर ठिकठिकाणी ‘वीर जवान, तुझे सलाम’ असे रांगोळीतून रेखाटले होते.

परंडा(जि.उस्मानाबाद) :‘शूर जवान अमर रहे’च्या गगनभेदी घोषणा देत सोनारी (ता.परंडा) येथील सागर तोडकरी या जवानास मंगळवारी (ता.१६) साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सैन्य दलातील जवान सागर पद्माकर तोडकरी (वय ३०, सोनारी) हे पंजाबमधील पठाणकोट येथे कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

वाचा :  राज्यात पुन्हा लॉकडाऊन? पण सर्वसामान्यांना परवडणार नाही

यासंदर्भात माहिती मिळताच तालुक्यावर शोककळा पसरली. पुणे येथून आज मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव सोनारी येथे आणण्यात आले. फुलांना सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मार्गावर ठिकठिकाणी ‘वीर जवान, तुझे सलाम’ असे रांगोळीतून रेखाटले होते. गावातील मुख्य चौकात मोठ्या संख्येने तरुण जमा झाले होते. कमांडो करिअर ॲकॅडमीचे महावीर तनपुरे यांच्यासह अॅकॅडमीचे तरुण सोनारी येथे नियोजनासाठी तैनात होते.

वाचा : चोरांनीही हात टेकले! दुचाकीची चोरी जमलीच नाय, चक्क गाडीचे स्पेअर पार्ट खोलून नेले

नगर येथील प्रशिक्षण केंद्राचे कॅप्टन रूपेश कुमार यांच्यासह अन्य जवानांनी सलामी दिली. पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर तोडकरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘सागर तोडकरी अमर रहे’, 'वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला. आमदार प्रा.तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, नवनाथ जगताप, सुभाषसिंह सद्दीवाल, बाळासाहेब पाटील, संजय पुजारी, रमेशसिंह परदेशी, नितीन गाढवे, अॅड. धनंजय झाडबुके आदी उपास्थित होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Updates Last Rituals On Solider In Sonari Paranda