
- ठरावीक वेळेतच फटाके वाजवण्यास परवानगी
- हरित लवाद आदेशाचे पालन करण्याचे महापालिकेचे आवाहन
रात्री आठ ते दहाच्या दरम्यानच वाजवा फटाके!
लातूर : राष्ट्रीय हरित लावादाने प्रदूषण रोखण्यासाठी फटाके वाजविण्यास निर्बंध घातले असून, त्याचे पालन करत शहरातील नागरिकांनी शक्यतो फटाक्याचा वापर टाळावा तसेच ठरवून दिलेल्या वेळेतच ग्रीन क्रॅकर्स (आवाज न करणारे) फटाक्याचा वापर करावा, असे आवाहन लातूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विषाणूचा धोका अजून पूर्णतः टळलेला नाही. आपले दुर्लक्ष अथवा बेजबाबदारपणा कोरोनावाढीस कारणीभूत होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. घरातच राहून सुरक्षितरीत्या दिवाळी साजरे करणे याला सर्वांनी प्राधान्य द्यावे. दिवाळी सणात फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विपरित परिणाम कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. कारण कोरोनाचा विषाणू हा फुफ्फुसावर मारा करीत असतो. त्यामुळे कोरोनाबाधित आणि कोमॉर्बिड लोकांना या धुराचा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. प्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांचा वापर करू नये; तसेच सॅनिटाईजर हे ज्वलनशील असल्याने फटाक्यांजवळ सॅनिटाईजरचा वापर करू नये. तसेच सामाजिक अंतर राखून, मास्कचा वापर करत दिवाळीचा सण आनंदात व उत्साहात साजरा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
राज्यातील विविध शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने ता. नऊ नोव्हेंबरच्या निर्णयान्वये मध्यरात्रीपासून फटाके वाजविण्यास निर्बंध घातले आहेत. प्रदूषणाच्या संदर्भात शहरांचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार लातूर शहराचा सॅटिस्फॅक्टरी या गटात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरामध्ये दीपावली सणाच्या कालावधित रात्री ८ ते १० या कालावधीतच फक्त ग्रीन क्रॅकर्स (आवाज न करणारे) या प्रकारचे फटाक्याचा वापर करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी फटाके वाजवण्या संदर्भात निर्देशांचे पालन करावे. विक्रेत्यांनीही विक्री करताना न्यायालयाचे आदेशाचे पालन करावे. हरित लवाद न्यायालयाच्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांचे पालन करून महानगरपालिकेला पर्यायाने सर्व नागरिकांच्या हितासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Web Title: Permission Firecrackers Specified Times
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..