ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी आराखडा करा : मंत्री अमित देशमुख   

हरी तुगावकर
Tuesday, 27 October 2020

मुंबईत लातूर मराठवाड्यातील ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी पुरातत्व विभागाची बैठक पार पडली.  यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अधिकार्यांना सूचना केल्या. 

लातूर : मराठवाड्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसामध्ये लातूर जिल्हा आणि आजूबाजूच्या प्रदेशाचा मोठा वाटा आहे. लातूर जिल्ह्याला समृद्ध बनवित असताना येथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करून सुनियोजित आराखडा तयार करा अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागातील विविध प्रश्नांबाबतची आढावा बैठक मंगळवारी (ता. २७) मुंबईत मंत्रालयात झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे, पुरातत्त्व वास्तुशास्त्रज्ञ तेजस्विनी अफाळे आणि राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्ह्याचा इतिहास जगासमोर आणत असताना येथील स्थानिक पर्यटन आणि रोजगार उपलब्धीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्यामध्ये लातूर जिल्ह्याला पर्यटनदृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्टया समृद्ध बनविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून काही योजना सुरू करणे गरजेचे आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट्य सांस्कृतिक विकासासाठी नियमावली किंवा मार्गदर्शन तत्त्वे तयार करणे हे असून, लातूरच्या अंतिम क्षेत्रीय योजनेतील ठळक उद्दिष्टांपैकी एक असणार आहे, असे श्री. देशमुख म्हणाले. हा ऐतिहासिक प्रदेश आजवर पर्यटनच्या दृष्टीने मागे राहिला आहे. त्यामुळेच राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाने लातूरसाठी सुनियोजित आराखडा बनवावा; तसेच संभाव्य आराखड्यामध्ये जिल्ह्यातील नैसर्गिक व ऐतिहासिक वारशाचे सुयोग्य नोंदणीकरण करणे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे-भाग सुनिश्चित करणे, तेथील सद्यःस्थितीचा आढावा घेऊन त्याच्या संवर्धनासाठी प्रकल्पाची मार्गदर्शनपर तत्त्वे तयार करणे या बाबींचा आराखड्यामध्ये समावेश करावा, अशी सूचना त्यांनी केली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एसटी महामंडळाचा सहभाग घेऊन शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिल्ह्यात सहली आयोजित करून त्यांना लातूरमधील समृद्ध वारशाची माहिती देण्यासाठी प्रयत्न करावे. त्याचबरोबर विविध विद्यापीठाच्या सहभागाने अभ्यास सहल, वारसा स्थळांचा दौरा आयोजित करता येऊ शकतात. जिल्ह्यात अनेक राजकीय व्यक्तिरेखा, शाहीर, कवी, साहित्यिक आदी कर्तृत्ववान व्यक्तींचा जन्म झाला आहे. या महान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा यासाठी त्यांचे जन्म गाव, त्यांच्या कर्मभूमी हे वारसा स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plan development for historical places Minister Amit Deshmukh